१३४ इमारतींची वीजव्यवस्था धोकादायक

शिळ-मुंब्रा-कळव्यातील इमारतींना टोरेंट पॉवर कंपनीच्या नोटिसा

ठाणे: शिळ-मुंब्रा-कळवा परिसरातील असुरक्षित वीजजोडणी आणि धोकादायक वीजवाहिन्यामुळे धोका निर्माण झालेल्या १३४ इमारतींना टोरेंट पॉवर कंपनीने नोटिसा बजावल्या आहेत. यात अनधिकृत वीज वापर तातडीने बंद करून विद्युत व्यवस्था दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

टोरेंट पॉवर कंपनीने शिळ-मुंब्रा-कळवा परिसरात विद्युत सुरक्षा आणि ग्राहक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान १३४ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात अनधिकृत वीजवापर आणि धोकादायक वायरिंगमुळे वीज धक्का, शॉर्टसर्किट आणि आगीचा धोका वाढत असल्याने संबंधित इमारतींना वीजव्यवस्था सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पहिल्या प्रकारात मीटरविना अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या इमारतींचा समावेश आहे. अशा अनधिकृत जोडण्यांमुळे विद्युत जाळ्यावर अतिरिक्त भार येऊन ते असुरक्षित बनते. परिणामी वीज धक्का, शॉर्टसर्किट, आग तसेच जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो. त्यामुळे संबंधित इमारतींना अधिकृत वीज मीटर घेऊन वीजपुरवठा नियमित करण्याची सुचना नोटीसमध्ये करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकारात वीज मीटर असलेल्या इमारतींचा समावेश आहे. या इमारतीमधील वीज मीटरपासून घरापर्यंत जाणारी अंतर्गत वायरिंग जीर्ण, असुरक्षित किंवा देखभालीअभावी धोकादायक बनते. काही ठिकाणी विद्युत यंत्रणा कमी उंचीवर असल्याने पावसाळ्यात पाणी साचल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे परवानाधारक विद्युत कंत्राटदारामार्फत वायरिंगची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्याचा सल्ला नोटीसमध्ये देण्यात आला आहे.