एकूण वाहन खरेदीची गुढी उंच
ठाणे: हिंदू नव वर्षाच्या दरम्यान जिल्ह्यात तीन हजार वाहन खरेदी करून ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे चारशे जास्त वाहन खरेदी करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्याचवेळी इलेक्ट्रिक वाहने खरेदीला नागरिकांनी कमी पसंती दिल्याचे आढळून आले आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे मागिल आठवड्यात सर्वाधिक २२३१ दुचाकी आणि ६७६ मोटार कारची खरेदी करून त्याची नोंदणी करण्यात आली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या 968 दुचाकी खरेदी करण्यात आल्या. इलेक्ट्रिक आठ, सीएनजीवरील सहा आणि पूर्ण विजेवरील ७४ दुचाकींची नोंद करण्यात आली आहे. पेट्रोलच्या २२ कार डिझेल च्या १८७, पेट्रोल /सी एन जी इलेक्ट्रिक ३७, डिझेल हायब्रीड तीन आणि पेट्रोल हायब्रीड नऊ आणि इतर ४०९ अशा एकूण ६७६ मोटर कारची नोंदणी झाली आहे. कृषी वाहन दोन, बांधकाम वाहन दोन, चार क्रेन, पाच मोपेड, २५ सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या चार दुचाकी आणि तेरा ट्रेलर अशा एकूण ३०५३ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सहा रुग्णवाहिका, १३ बस, २८० ट्रक, ९७ मोटर कॅब, १६७ रिक्षा, तीन ट्रेलर, नऊ डम्पर, ३२ वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षा, अशा एकूण ६१२ ट्रान्सपोर्ट वाहनांची देखिल नोंदणी झाली आहे.
मागिल वर्षी २६४६ वाहनांची नोंद झाली होती तर ६६१ ट्रान्सपोर्ट वाहनांची नोंद झाली. यावर्षी वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी कमी झाली आहे. मोटर सायकलची मागिल वर्षी १६०३ इतकी कमी नोंदणी झाली होती. मागिल वर्षी १००८ चार चाकी गाड्यांची खरेदी करण्यात आली होती मागिल वर्षाच्या तुलनेत यावर्षी चार चाकी गाड्यांची कमी नोंदणी झाली आहे.
मागील वर्षी १३९ पूर्ण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात आली. यात ५८ मोटार सायकल आणि ७७ मोटार कारचा समावेश होता. यंदा मात्र ११६ पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली. यात ७४ मोटार सायकल आणि ३७ मोटार कार यांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २३ वाहने कमी नोंदविली गेली.