मनसे पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी
अंबरनाथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना येत्या नगरपालिका निवडणुकीत त्यांची लायकी दाखवू , निवडणुकीत त्यांचा पराभव करून दाखवणार अशा घोषणा अंबरनाथमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या आणि पक्ष सोडून गेलेल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
अंबरनाथचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदीप लकडे, ऍड.स्वप्नील बागुल तसेच माजी नगरसेविका आणि माजी सभापती अपर्णा भोईर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काल शनिवार (9) ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे , खासदार डॉ .श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ .बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेचे अंबरनाथला आज रविवार (10) ऑगस्ट रोजी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले.
जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या पूर्व भागात भोईर, लकडे आणि ॲड. बागुल यांच्या परिसरात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. उल्हासनगरचे बंडू देशमुख, बदलापूरच्या संगिता चेंदवणकर, मनवीसेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.