* ठाण्यात सोसाट्याचा वारा, पाऊस
* होर्डींग, वेदर शेड कोसळल्या
* जागोजागी झाडे, फांद्या पडल्या
ठाणे: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पूर्व मान्सूनच्या सुसाट वाऱ्याने आणि काही काळ पडलेल्या मुसळधार पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्याची त्रेधा उडविली. सुरुवातीला ताशी १०० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ठाण्यात वेदर शेड, भव्य होर्डिंग्ज आणि झाडे कोसळली. तर मध्य रेल्वे देखील सुमारे एक तास ठप्प झाली. तर निवडणूक प्रचाराचे नियोजित कार्यक्रम देखील राजकीय पक्षांना रद्द करावे लागले.
सोमवारी दुपारी अचानक आकाशात वावटळ उठली. संपूर्ण आकाशात धूळ उडू लागली, जोरजोरात वारे वाहू लागले त्यामुळे शहरातील ५०पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. अनेक दुचाकी वाऱ्याने पडल्या. तलावपाळी आणि मुख्य बाजारपेठ येथे इमारतीच्या गच्चीवर उभारण्यात आलेले वेदर शेड उडून खाली पडले. सुरुवातीला वाऱ्याचा वेग सुमारे ताशी १०० किमीच्या वेगाने वाहत होते. या वाऱ्याने या भागातील एका घराची लोखंडी ग्रील देखिल उडून रस्त्यावर पडली होती तसेच भिवंडी एसटी स्थानक परिसरात लोखंडी शेड उन्मळून पडली होती. त्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या इमारतीवरील वेदर शेड देखिल उडून साठे वाडी येथिल घरावर पडली होती. यामध्ये घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले.
जांभळीनाका येथे इमारतीच्या छतावरील पत्र्याची पूर्ण शेड पडल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. या घटनेत राबोडी येथे राहणारे शफीक सिद्दीकी ( २५ ) यांना दुखापत झाली आहे. यांच्या दोन्ही हाताला तसेच उजव्या पायाला मार लागल्याने उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे. येथे उपस्थित असलेले वृत्तपत्र छायाचित्रकार मनोज सिंग यांनी मदतकार्य केले.
शहरातील विविध भागांत पावसाचे पाणी साचले होते. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. दिवा भागात देखिल सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. गटाराचे आणि नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते. नौपाडा येथिल चिखलवाडी येथिल नाला तुडुंब भरला होता, त्यामुळे या भागातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देऊन महापालिकेने पाण्याचा पम्प लावून नाल्यातील पाणी काढले. शहरात १९.२८ मिमी पावसाची नोंद झाली.