ठाणे : फेरीवाल्यांची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर फेरीवाल्यांचे प्रश्न मांडण्यासाठी १३ सदस्यांच्या निवडीसाठी आता फेरीवाल्यांची निवडणूक घेतली जाणार आहे. ठाणे महापालिकेने १३०० फेरीवाल्यांची अंतिम यादी जाहीर केली असून या १३०० फेरीवाल्यांमधून १३ सदस्य निवडून जाणार आहेत. ठाणे महापालिकेत बुधवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला चालना मिळाली असून या धोरणाची अंमलबजावणी करताना आलेल्या हरकती आणि सूचनाही निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर १३६७ फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या धोरणाच्या अंमलबजावणी प्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार कि नाही याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे. शहरातील फेरीवाल्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर आता बुधवारी झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीमध्ये फेरीवाला धोरण राबवणे, काही फेरीवाल्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांचे नाव निश्चित करणे तसेच फेरीवाल्यांची निवडणूक घेणे अशा विषयांची चर्चा करण्यात आली. यामध्ये फेरीवाल्यांची निवडणूक लवकरच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून फेरीवाल्यांकडून १३ सदस्य निवडणूक गेल्यावर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने चालना मिळणार असल्याची माहिती फेरीवाला समितीच्या सदस्यांनी दिली आहे.
फेरीवाला धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी एकीकडे प्रशासनावर दबाव असताना दुसरीकडे कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी फेरीवाला समितीची बैठक झाली आहे. सहा महिन्यांनी एकदा फेरीवाला समितीची बैठक घेणे आवश्यक असताना अशाप्रकारे समितीची बैठकच एवढ्या विलंबाने होत असेल तर या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील १३०० फेरीवाल्यांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये काही फेरीवाल्यांनी नोकरीवर असताना आपल्या मुलांची नावे यादीत टाकली होती. तर बोगस नोंदणीही रद्द करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ही निश्चित झालेली यादी कामगार उपायुक्तांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली आहे.