दुकानाचे छत कोसळून वृद्धाचा मृत्यू; दोघे जखमी

भाईंदर: मीरारोडमध्ये एका दुकानाच्या छताचा काही भाग कोसळून ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना शनिवारी रात्री सुमारे ८ वाजता मीरा नर्सिंग होम लेन परिसरातील साहिल निवास इमारतीतील दुकान क्रमांक २ मध्ये घडली. स्थानिक सूत्रांनुसार, अचानक दुकानाच्या छताचा मोठा भाग कोसळला, ज्याखाली तिथे उपस्थित असलेले तिघे जण अडकले. अकील कुरेशी (६८) असे मृत्यू पावलेल्या रहिवाशाचे नाव आहे. छताचा अवजड स्लॅब अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर दोन व्यक्तींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून छत कोसळण्याचे कारण तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात छताची स्थिती जीर्ण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.