परराष्ट्र खात्याची माहिती
नोकरीच्या आमिषाने रशियात गेलेले काही भारतीय तरुण रशिया-युक्रेन संघर्षात अडकले आहेत. या तरुणांची सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केला जातोय. भारतीय परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार अशा २० तरुणांची रशियन सैनिकांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न केले जातायत. रशियात असेलेल्या भारतीयांनी युद्धात सहभाही होऊ नये. तसेच युद्धाच्या क्षेत्रात जाऊन कठीण परिस्थितीत अडकू नये, असे आवाहन भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी केले आहे.
“आम्ही रशियन प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दिल्ली तसेच मॉस्कोतून आमचे या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत,” असेही जैस्वाल यांनी सांगितले. सोमवारी परराष्ट्र खात्याने याआधीच रशियाने काही भारतीयांची सुटका केली आहे, असे सांगितले होते.
रशिया-युक्रेन युद्धात रशियाने काही भारतीयांना सपोर्ट स्टाफ म्हणून सामील करून घेतले आहे. तसेच रशियाकडून लढण्यासाठीही या भारतीयांवर दबाव टाकण्यात येतोय, असे माध्यमांत सांगितले जात होते. त्यालाच उत्तर म्हणून “माध्यमांत चुकीचे वृत्त दिले जात आहे. रशियन सैनिकांकडून आमची सुटका करा, अशी मागणी काही भारतीयांकडून केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले होते. परराष्ट्र खात्याच्या निदर्शनास आलेल्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जात आहे. याआधीच काही भारतीयांची रशियाने सुटका केलेली आहे,” असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले.
मूळचा सुरत येथील राहिवासी असलेल्या २३ वर्षीय हेमिल मंगुकिया या तरुणाचा रशियात क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मंगुकिया हा तरुण रशियात युक्रेनच्या सीमेवर युद्धक्षेत्रात होता. तो मदतनीस म्हणून या युद्धभूमीवर काम करत असल्याचे इंडियन एक्स्प्रेच्या या वृत्तात म्हणण्यात आले होते.