राजकारण गुंतागुंतीचे असते हेच खरे. निर्विवाद बहुमत मिळूनही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटू नये, ही बाब वरील निष्कर्षास पुष्टी देते. श्री. एकनाथ शिंदे यांनी मोदी-शाह यांच्यावर निर्णय सोपवल्यावर हा पेच गुरुवारी दिवसभरात संपेल ही अटकळ खोटी ठरली. देवेंद्र फडणवीस यांचे ब्राह्मण असणे ही अडचण झाल्याची बातमी प्रसारित झाली आणि त्यामागे विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांचाच हात असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे दणदणीत यश मिळूनही भाजपा नेता निवडीत चाचपडत असल्याचे चित्र समोर आले. ही बाब मतदारांना पसंत पडेल काय याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी घ्यावा लागेल. फडणवीस यांच्या वाटेवरील काचा मात्र कमी झालेल्या नाहीत हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांवर युतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान झाले. त्यामागे प्रामुख्याने दोन चेहरे होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. त्यापैकी शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजपच्या कोर्टात चेंडू ढकलून दिला. फडणवीस हे जर चेहरा होते तर त्यांच्याबाबत आता संदिग्धता कशी काय निर्माण झाली असा सवाल विचारला जाऊ शकतो. जी शंका आता उपस्थित होत आहे ती निवडणुकीत त्यांचा चेहरा म्हणून वापरताना का उपस्थित झाली नव्हती, असा दुसरा सवालही विचारला जाऊ शकतो. श्री. फडणवीस यांचे नाव प्रचारादरम्यान जाहीर करून ते तातडीने मागे घेतले गेले होते. अमित शाह आणि फडणवीस यांच्यातील संबंध तर या शंकेचे मूळ नसेल असा तिसरा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सत्तारूढ पक्षांना, मग तो भले भाजपा जरी असला तरी, पक्षांतर्गत कलहांना सामोरे जावे लागतेच. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ हा दावा अशावेळी फोल ठरतो. युतीमधील घटक पक्षांचे नेते, शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांचे आपापसातील संबंध उत्तम होते आणि या तिन्ही पक्षांची मते एकमेकांच्या पारड्यात पडली होती. फडणवीस यांच्या पारड्यात पक्षांतर्गत एकमत पडत नसेल तर ती त्यांच्यासाठी शोकांतिका ठरू शकते. अशा परिस्थितीत भाजपा अन्य कोणाला संधी देईल का की श्री. शिंदे यांना कारभार पुढे सुरु ठेवण्यास सांगतील हे पाहावे लागेल.
फडणवीस यांचा पत्ता कापण्याचे काम भाजपातून सुरु झाले आहे आणि त्याचा दूरगामी परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतो. फडणवीस यांचे नेतृत्व आश्वासक असल्यामुळे तर पक्षातील काही बड्या नेत्यांची अस्वस्थता वाढली नसेल? महाराष्ट्राचे भवितव्य राजकीय चक्रव्युहात अडकले आहे हेच खरे. भाजपातील अंतर्गत गटबाजीस कोण्या बड्या नेत्याची फूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे. बघू या काय होते ते! भाजपाचे काँग्रेसीकरण सुरु झाल्याचे तर हे लक्षण नव्हे?