भाजपाचा ‌’गेम‌’ काय?

ठाणे जिल्ह्यात संघटना वाढवण्याचे भाजपाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. प्रदेशाध्यक्षपदी रविन्द्र चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांनी ते स्पष्ट केले होतेच. मंगळवारी झालेल्या प्रदेश समिती पुनर्रचनेत ठाण्याचे विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे आणि ॲड. माधवी नाईक यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्या भावी व्यूहरचनेवर त्यांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. आगामी किमान तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्या तरी डावखरे-नाईक संघटना कशी बांधतात यावर पक्षाचे यश अवलंबून असणार आहे. सरचिटणीसपद हे जबाबदारीचे असते आणि पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षांना उतरण्याचे त्यात आव्हानही असते. या दोघांत तशी क्षमता आहे म्हणून त्यांचा विचार झाला असेल तर त्यांना तसे सिद्ध करावे लागेल.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजपाची घोडदौड सुरू आहे. त्यांच्या आमदारांची संख्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे. ती संख्या वाढवून जिल्हा शतप्रतिशत करण्याचे भाजपाचे नियोजन असणार. त्यामुळे या दोघांना बरेच परिश्रम करावे लागणार यात वाद नाही.

शिवसेना हा महायुतीमधील मित्र-पक्ष असल्याने भाजपा नेते उघडपणे या ‘मित्रा’ला (?) अंगावर घेताना दिसत नसला तरी स्थानिक पातळीवर उडणाऱ्या ठिणग्यांनी आग पेटू नये याची काळजी घेतानाही नेतृत्व दिसत नाही. सत्तेत सहभागी असूनही भाजपाला शिवसेना फार किंमत देईल असे वाटत नाही. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत होताना दिसत आहे. सत्तारूढ सेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजपा सोडणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे. सोमवारी झालेल्या ठाणे महापालिका सभेत त्याची झलक दिसलीच. विरोधी पक्षाची भूमिका तेच निभावतील. ही गोष्ट युतीधर्माला साजेशी नसेलही. परंतु ती सातत्याने घेतली जाणार यात वाद नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करणे हा व्यूहरचनेचा भाग असू शकतो. परंतु हे सर्व बेमालूमपणे करण्यात येईल आणि तिथे डावखरे-नाईक यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल.

भाजपाच्या नियुक्त्यांमागे मोठा विचार असतो. ते प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या उपयुक्ततेचे मूल्यांकन करीत असतात. दोघेही सरचिटणीस सुशिक्षित आहेत. ठाणे, पालघर आणि एमएमआर क्षेत्राचा विचार करता आणि ते जर या दोघांचे प्रभाव-क्षेत्र मानले जात असेल तर डावखरे-नाईक जनतेवर चांगली छाप पाडू शकतील. सुशिक्षित नेत्यांची प्रतिमा उजळ असते आणि ती स्वीकारण्यात अडचण येत नाही. ही मंडळी संयमी आणि शिस्तीच्या चौकटीत काम करणारी असतात. परंतु राजकारण उपद्रवमूल्यांवर अधिक चालते. त्यातून दहशत आणि जरब निर्माण होत असते. डावखरे-नाईक त्या कसोटीवर प्रचलित राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‌’मवाळ‌’ ठरतात. त्यांना हा मवाळपणा जपत नेतृत्वाला आदरयुक्त जहालपणा द्यावा लागेल. ठाणेकरांना मामलेदारची मिसळ आवडते, पण सोसतेच असे नाही. बघुया डावखरे-नाईक मामलेदार मिसळ देतात की गोखल्यांची तितकीच चविष्ट मिसळ?