तारे आपुले, क्षितीज परके !

नेत्यांची अत्यंत शिवराळ आणि असंबद्ध विधाने वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकत असताना इन्फोसिसचे संस्थापक डॉक्टर नारायण मूर्ती यांचे भाषण प्रसिद्ध झाले आणि त्यावर सर्वांनी विचार करावा असे वाटून गेले. देशाला खरोखरच महान करायचे असेल तर ‘मेरा भारत महान’ असा फक्त जयघोष करून चालणार नाही तर त्याला कठोर परिश्रम, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाची जोड द्यावी लागेल, असे डॉ. मूर्ती म्हणाले. इन्फोसिसचे साम्राज्य शून्यातून निर्माण करणाऱ्या डॉ. मूर्तींनी नोंदवलेल्या निरीक्षणास त्यांच्या यशोगाथेचा आधार आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे भारताच्या विकासाबद्दल त्यांना कळकळ आहे म्हणून विचारात घ्यायलाच हवे. सर्वसामान्यपणे डॉ. मूर्ती यांनी जे विचार मांडले आहेत त्याबद्दल कोणाचे दमत असायचे कार ु ण नाही. ज्या गुणवैशिष्ट्यांचा त्यांनी उल्लेख के ला आहे ते शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रमात तयार होत नाही. ते गुण भारतीय मानसिकता आणि वर्षानुवर्षांच्या समाजाच्या मूल्यव्यवस्थेतून आणि संस्कारातून निपजत असतात. ही समाज व्यवस्था होती म्हणूनच आपला देश अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्व आघाड्यांवर जगाच्या पुढे होता. सततच्या आक्रमणांमुळे आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे समाजाचा ढाचा तुटत गेला आणि अधोगतीस सुरुवात झाली. हे सारे ठरवून झाले होते. भारत हा महासत्ता होऊ शकतो आणि तसे होणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते हे तथाकथित महासत्तांनी ओळखले आणि आपल्या सर्व आदर्श परंपरांवर घाला घालण्याचे सुनियोजित काम सुरू झाले. त्याचा परिपाक आजची देशाची विदारक स्थिती आहे. हे लक्षात घेऊन डॉ. मूर्ती यांच्या विधानाचा विचार करावा लागेल. त्यातच घडी पुन्हा नीट बसवण्याची बिजे आहेत. जागतिकीकरणामुळे संधीची असंख्य दालने उघडली जात असून भारतीयांनी त्यांच्यातील उपजत हुशारीमुळे त्यात के वळ प्रवेश के ला नाही तर त्या-त्या क्षेत्रात ते आघाडीवर आहेत. भारताची गेल्या वीसपंचवीस वर्षातील प्रतिमा हळूहळू सुधारली हे नाकारून चालणार नाही. याचा परदेशांना फायदा झाला. आपले डॉक्टर, वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ, अर्थतज्ज्ञ आदी
परकीय क्षितीजावर चमकत आहेत. त्यांना आपल्या देशातील सरकारने क्षितीज उपलब्ध करून देण्यासारखी परिस्थिती निर्माण करून दिली नाही. चुकीची धोरणे, अकार्यक्षम आणि भ्रष्ट व्यवस्थेत डॉ. मूर्ती म्हणतात ती प्रामाणिक पिढी तयार झाली नाही. हा दोष देशात फोफावलेल्या सवंगपणाचा होता. तो जोवर जात नाही तोवर भारतातील गुणवंतांना परदेशातील क्षितीजेच बोलवत राहणार. डॉ. मुर्तींचे म्हणणे सरकार दरबारी धोरणे आखणाऱ्या आणि गुणवंतांची पद्धतशीर गळचेपी करणाऱ्यांनी खरे तर लक्षात घ्यायला हवे.