आनंद आणि उत्साहाचे डबल इंजिन!

सुवर्ण महोत्सव थाटात साजरा करुन आम्ही ५१व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ‘ठाणेवैभव’वर निर्व्याज आणि नि:स्पृह प्रेम करणाऱ्या आमच्या हितचिंतकांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तुडुंब भरले होते आणि विशेष म्हणजे सुमारे साडेतीन तास चाललेल्या या नेत्रदीपक सोहळ्यातून शेवटपर्यंत एकही खूर्ची रिकामी राहिली नव्हती. आम्ही त्याबद्दल सर्वांचे अंत:करणपूर्वक ॠणी आहोत आणि या कृतज्ञ भावनेची शिदोरी घेऊनच आम्ही पुढील प्रवासास निघालो आहोत.
‘ठाणेवैभव’चे ठाणेकरांच्या मनातील स्थान या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अधोरेखित झाले. विधायक, सकारात्मक आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आजही सन्मान होतो यावरची आमची श्रद्धा द्विगुणीत झाली. आमचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबले. इतक्या व्यस्त दिनक्रमात त्यांनी असा अमूल्य वेळ देणे हा त्यांच्या चांगुलपणाचा नमुना आहेच, पण त्याहीपेक्षा ज्या मातीतून आपण घडलो, त्या ‘ठाणेवैभव’चा खारीचा का होईना वाटा आपल्या जडणघडणीत आहे, ही प्रांजळ कबुली त्यांच्या पूर्णवेळ उपस्थितीतून व्यक्त होत होती.

पद्मविभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि आपल्या रामशास्त्री प्रभुणे बाण्यामुळे प्रसिद्ध झालेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक ‘ठाणेवैभव’ला आशीर्वाद देण्यासाठी आले, याचे अप्रुप आम्हाला कायम रहाणार. ‘ठाणेवैभव’च्या पुण्याईचा हा भाग असला तरी ही मोठी माणसे तितक्या मोठ्या मनाने आमच्यासाठी आली याबद्दल आम्ही त्यांचे कायमच ॠणी राहणार आहोत. ‘ठाणेवैभव’ योग्य मार्गावर असल्याची ही मान्यवरांकडून जणु पावती होती आणि त्यामुळे हा विश्वास टिकून रहाण्याचे उत्तरदायित्व येते हे आम्ही लक्षात ठेवणार आहोत.

‘ठाणेवैभव’चे संस्थापक कै.नरेंद्र बल्लाळ यांचे ‘ठाणेवैभव’च्या गोष्टी सांगण्याचे स्वप्न आम्ही ‘छापता-छापता: कहाणी सावलीतून जन्मलेल्या वृक्षाची’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने पूर्ण केले. तसेच आम्ही गेल्या २० वर्षांत लिहिलेल्या ‘पॉईट ब्लॅक’ या साप्ताहिक स्तंभाचे तीन खंड आणि इंग्रजी भाषेतील ‘कॉफी टेबल-बुक’ अशा पाच ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. ‘ठाणेवैभव’ची विचारधारा यामुळे वाचकांपुढे गेली. ही पुस्तके विविध कारणांसाठी संग्राह्य ठरतील आणि ठाणे जिल्ह्याचा अभ्यास करणाऱ्यांना उपयोगी पडतील.

‘ठाणेवैभव’च्या ५० वर्षांचे वर्णन कसे कराल, असा प्रश्न आमच्या चोखंदळ वाचकांतर्फे करण्यात येत असतो. प्रयोगशिलता, कल्पकता, कठोर परिश्रम, सातत्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन, या पाच सूत्रांनी ही ५० वर्षे बांधली गेली आणि सकारात्मक उपक्रमांच्या विणेने ती घट्ट झाली. हीच पाच सूत्रे आणि त्याला सामाजिक बांधिलकीची जोड हा आमचा पायाभूत आधार आम्ही सोडणार नाही. मुद्रित माध्यमांचे (प्रिंट मीडियाचे) दिवस संपले असे बोलणाऱ्यांना ‘ठाणेवैभव’ने हा मैलाचा दगड पार करून सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करु.’ हा संत तुकारामांचा भावनिक विचार ‘ठाणेवैभव’च्या जडणघडणीचा आत्मा आहे. ‘शब्दचि आमच्या जीवाचे जीवन, शब्दचि धन वाटू जन लोका, असे म्हणत आम्ही ‘ठाणेवैभव’च्या वृक्षाच्या असंख्य पारंब्या जन्मास घातल्या. ‘नो युव्हर टाऊन’ ते २२ विविध मुखपत्रे काढून ‘ठाणेवैभव’ने मराठमोळ्या वाचकांप्रमाणेच अमराठी वाचकांशीही नाळ जोडली. समाज जोडत रहाणे हा आमचा ध्यास असल्याने नकारात्मक आणि उपद्रव्यमूल्य पत्रकारितेला ‘ठाणेवैभव’ने कधीच थारा दिला नाही. उपद्रवापेक्षा उपयुक्तता आणि उत्तरदायित्व यावर आमचा भर असतो आणि तेच सुवर्ण महोत्सवी परंपरेचे गमक आहे. ‘ठाणेवैभव’च्या सर्वमान्यतेचे हे द्योतक आहे!

मुंबईजवळ असूनही ‘ठाणेवैभव’ने हा पल्ला गाठला याचे सर्वांना कौतुक आहे. आम्हाला त्याबद्दल आनंद वाटतो. हा आनंद वृध्दिंगत करण्यासाठी आम्ही ‘ठाणेवैभव’ परिवाराचे सर्व सदस्य, आमचे वितरक आणि आमच्यावर प्रेम करणारे जाहीरातदार आणि वाचक शतकमहोत्सवाचा वेध घेण्यास कटीबद्ध आहोत. आम्हाला यश खुणावत आहे, कारण आम्हाला तुम्ही बरोबर असण्याची खात्री आहे. राजकीय परीभाषेत बोलायचे झाले तर आनंद आणि उत्साहाचे डबल इंजिन आम्हाला लाभले आहे. प्रवास सुकर होणारच, मुंबईची सावली कितीही गडद झाली तरी !!