बहुचर्चित अटल सेतू महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावणार आहे. सुमारे 22.5 कि.मी. लांबीचा हा पूल 16 कि.मी. समुद्रावरुन जात आहे. देशातील पुलाच्या लांबीत तिसरा क्रमांक या पुलाने पटकावला आहे. देशातील अभियंते आणि त्यांच्या क्षमता अजमावणारा हा प्रकल्प सर्वांसाठी अभिमान-बिंदू ठरत असताना काही हौशी आणि अति-उत्साही लोक हे लौकिक धुळीस मिळवणार अशी शंका मनात चुकचुकत आहे. या प्रकल्पाबद्दल जनसामान्यात असलेले कुतुहल या पुलावरुन झालेली 45 हजार वाहनांची ये-जा सिद्ध करुन गेली. त्यात काही मंडळीनी ‘सेल्फी’ काढण्याचा सपाटा लावला. पोलिसांनी त्यांना रीतसर कारवाईचा धपाटा घातला. परंतु सवंगपणा आणि अपरिपक्वता या गुणांचे दर्शन घडवून वाहनचालकांनी आपली लायकी सिद्ध केली. त्यात भरीस भर रविवारी एका भरधाव वाहनाने गटांगळ्या खाऊन पहिला अपघात करण्याचे श्रेय मिळवले! दैव बलवत्तर म्हणून वाहनातील सर्व प्रवासी सुखरुप राहिले. परंतु वेग आणि शिस्त याबाबत भारतीयांमध्ये असलेली अंगभूत उदासिनता यावेळी आपल्याला पहाण्यास मिळाली. हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना या वाहनचालकास कठोर शिक्षा व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे. मागून-पुढून येणाऱ्या वाहनांना या अतिशहाण्या वाहनचालकामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. किंबहुना काही बळी नाहक गेलेल असते आणि अटल सेतूच्या वाट्याला समृद्धी महामार्गासारखी बदनामी आली असती.
अटल सेतुवर असे अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेतली गेली आहे, तशीच अपघातानंतर मदतकार्य तातडीने पोहोचण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आली आहे. याचा अर्थ गाडी वाट्टेल तशी हाकण्याचा परवाना मिळाला आहे असे कोणी समजता कामा नये. रविवारच्या अपघाताची कारणमीमांसा संबंधित खाती करतील, पण वाहनचालकाला त्यांच्या बेदरकरपणासाठी मोठा दंड ठोठावण्याची योजनाही करावी लागेल. स्वत:च्या जीव धोक्यात घालताना दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करणे हे जबाबदारीचे लक्षण नाही. प्रगतीचे नवनवे मैलाचे दगड पार करताना जुन्या सवयींना मोडता घालायला हवा असा धडा हा अपघात देऊन जातो. शहारातील वाहतुकीवर प्रचंड ताण आहे अशी तक्रार आपण वारंवार ऐकत असतो. यामागे अरुंद रस्ते, मेट्रोची कामे, अतिक्रमणे वगैरे ही कारणे सांगितली जात असली तरी खरे कारण वाहनचालकांत शिस्तीचा अभाव हेच मुख्य कारण आहे. या बेशिस्तीला वेसण घालण्याचे काम होताना दिसत नाही. तसे झाले तरच उड्डाण-पूल, रुंद, रस्ते, मेट्रो आदी सुविधांमुळे दर्जात्मक बदल झाला असे म्हणता येईल.