सैनिक स्वत:ला ′शिंदे′ समजू लागले….!

भाजपाला खासगी न्यासांकडून सर्वाधिक 82 टक्के म्हणजे 3112 कोटी रुपये देणग्यांच्या स्वरुपात आल्याची बातमी पहिल्या पानावर झळकत असताना तिचा मतदारांवर परिणाम होत नसल्याचा पुरावा देणारी बातमी मुख्य मथळा खाते याचा अर्थ राजकीय विश्लेषक जो काही लावतील तो प्रत्यक्षात नगरपालिकांच्या निकालामुळे पुसला जात आहे. 288 पैकी 117 नगराध्यक्षपदे पटकावणाऱ्या भाजपाने 3325 नगरसेवक निवडून आणून एक विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे भाजपाला निवडणूक निधीप्रमाणे मतदारांची घसघशीत मदत झाली आहे आणि त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर न झाला तरच नवल.
भाजपाच्या दणदणीत विजयाची कारणमीमांसा करताना कौतुकाचा वर्षाव तर होणारच आहे. परंतु त्यापेक्षा हा पक्ष निवडणूक लढवताना किती खोलवर विचार करतो, व्यूहरचना आखतो आणि पक्षाच्या व्यापक हिताचा प्रत्येक कार्यकर्ता विचार करतो ही खरी कारणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी 50 वर जाहीर सभा घेतल्या, अन्य पक्षांतून येणाऱ्यांचे स्वागत केले आणि नव्या इनकमिंगमुळे पक्षात वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली. पक्षांतर्गत कलह ही बाब शिवसेनेला महाग पडली. स्थानिक आमदारांशी असलेले मतभेद, घराणेशाहीचा अतिरेक सरंजामशाही वृत्ती, ‘हम करे सो कायदा’ या थाटात वावरणारे नेते आणि त्यांचे अंहकार यांमुळे शिवसेनेला अंबरनाथ तसेच बदलापूर पालिकेचे नगराध्यक्षपद गमवावे लागले.
अंबरनाथ हा सेनेचा बालेकिल्ला रहावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्षात आणलेले मोठे प्रकल्प मतदारांवर प्रभाव पाडू शकले नसल्याचे निकालावरून दिसते. मतदारांना नेमक्या कोणत्या मुद्यावर मग भाजपाने आकर्षित केले याचा अभ्यास शिवसेनेला करावा लागेल. नेत्यांना चांगले काम करताना जनतेबरोबर संवाद ठेऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे लागते, असा मोठा संदेश अंबरनाथ पालिकेने दिला आहे.
नगराध्यक्षांची निवडणूक थेट झाली. शिवसेनेकडे हे पद एरवी आले असते कारण त्यांचे पक्षीय बलाबल अधिक आहे. अर्थात तसे झाले नाही. जनतेने नगरसेवक जादा निवडून आणले पण नेतृत्व करण्याची संधी मात्र सेनेला नाकारली. याचा विचार सेना नेत्यांना करावा लागेल. नेतृत्वगुणात भाजपा सरस आहे असे तर मतदारांना वाटले नसेल? ही शंका स्थानिक नेत्यांना आत्मपरीक्षणास भाग पाडणारी आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपद गेल्यावर स्थानिक आमदार आणि खासदारांवर खापर फोडले जात असताना पक्षाने त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही आणि संघटनात्मक त्रुटीवर एकप्रकारे बोट ठेवले.
या निवडणुकींचा ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिका निवडणुकींवर परिणाम होऊ शकतो. भाजपाचा वाढलेला आत्मविश्वास त्यांना जादा जागा मागण्याचे नैतिक बळ देऊ शकते. श्री. एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. पक्षप्रवेश करुन घेणे आणि जुने लोक सोडून जाणार नाही, अशी दुहेरी खेळी खेळताना पक्षांतर्गत भांडणे शमवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागणार. हे काम दुसऱ्या फळीने करावयाचे असते, परंतु शिंदे यांच्या जवळचे स्वत:ला शिंदेंपेक्षा मोठे समजू लागल्यामुळे पराभवास कारणीभूत ठरत आहे. भाजपचे ‘केडर’ या उलट मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि पक्षाच्या भूमिकेची सुयोग्य मांडणी करू लागल्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेत प्रत्येकाने स्वतःला शिवसैनिक समजायला हवे. परंतु ते स्वतःला शिंदेच समजू लागल्यामुळे गोंधळ वाढला आहे.