भय इथे संपत नाही, या धर्तीवर नाट्य इथे संपत नाही, असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातील राजकारण पाहून आली आहे. सत्तेची साधीसुधी गणिते कशी किचकट केली जातात आणि ती तशी का झाली याचा मागोवा घेताना निवडणुकीत जे एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे होते ते प्रत्यक्षात मित्र तर नसावेत? निवडणुकीतील मैत्रीपूर्ण लढतींचा अर्थ यानिमित्ताने सर्वसामान्यांना पटू शकतो. अन्यथा राज ठाकरे यांनी ज्या शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला, त्यांच्या सोबत कसे गेले असते? कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेनेला मनसेची मते लागणार आहेत. उभयतांनी हातमिळवणी करून भाजपाला खिंडीत पकडले आहे. आता एका दगडात दोन पक्षी कोणी कोणाच्या सांगण्यावरून मारले याचा तपास येत्या काही दिवसांत सार्वजनिक चर्चाविश्वात होत राहील. तोवर सर्व ठिकाणी महापौर बसलेले असतील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात ठाकरे परिवाराच्या वाट्याला सत्ता तर सोडाच क्लेश आला असेल. भाजपाचे देवेंद्र फडणविस यांची ही आणखी एक खेळी तर नव्हती असे बोलले जाऊ लागले आहे.
कल्याण-डोंबिवलीत सेना आणि भाजपा यांच्यात संघर्ष पेटला होता. भाजपाच्या मते उल्हासनगरला सेनेने पहिली कळ काढली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून कल्याण-डोंबिवलीतील सेना पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जाऊ लागला. ही फोडाफोडी शिगेला पोहोचू लागल्यामुळे महायुतीचा धर्म संकटात आला आणि त्याचा परिणाम मुंबईसह, ठाण्यातही होईल, असे जाणवल्यामुळे भाजपाच्या शिर्षस्थ नेतृत्वाने सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पक्षांतरे खरोखरीच थांबली आणि आता सर्व सुरळीत चालेल असे वाटत असतानाच सेना आणि मनसे एकत्र आल्याची घोषणा झाली. ‘एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी’ याची ग्वाही ठाणे आणि मुंबईत झालेल्या जाहीर सभांमध्ये देण्यात आली. नाही म्हणायला उद्धव ठाकरे यांना ६५ ठिकाणी यश लाभले. तुलनेने मनसेचे यश नगण्य ठरले. ठाकरे ब्रॅण्डचा फायदा उद्धव यांना अधिक झाला. निवडणुकीतील पराभव, उद्धव यांच्या सेनेकडून मिळालेले सहकार्य आणि आगामी काळात आपले काय स्थान असणार या तिहेरी विचाराने अखेर मनसेला सेनेशी जवळीक करावीशी वाटली. एकनाथ शिंदे यांचे मनसुबे पूर्ण होण्यात मदत होईल. कडोंमपातील महापौरपद तर मिळेलच, परंतु त्याहीपेक्षा मुंबईत भाजपाशी महापौर पदासाठी वाटाघाटी करताना मनसेमुळे ताकद वाढेल. मराठी माणसाला महापौर करून भाजपा जन्मशताब्दी वर्षाची भेट देईल अशी श्री. शिंदे यांची भूमिका असेल.
या सर्व प्रकरणात राज ठाकरे यांची अधिकृत प्रतिक्रिया कळू शकली नसल्याने खा.संजय राऊत यांनी राज व्यथित झाल्याचे सांगून अजूनही ठाकरे बंधू एकत्रच आहेत असे सुतोवाच केले आहे. राजकीय संक्रांतीचे पतंग आभाळात उडत राहणार असे दिसते, पण कोण कोणाचा पतंग कापणार हे मात्र सांगणे कठीण होऊन बसले आहे!