महापालिका निवडणुकीत जे विजयी झाले ते जल्लोष करण्यात मग्न आहेत. परंतु ज्यांच्या वाट्याला पराभव आला ते मात्र खिन्न आहेत. आपल्यावर मतदारांनी अन्याय केला, आपल्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली नाही आणि आपल्यापेक्षा सर्वच दृष्टीने दुबळ्या असलेल्या उमेदवाराला मतदान झाले. ढोबळमानाने हे तीन मुद्दे पराभूत उमेदवाराला सतावत आहेत आणि त्याबाबत काही जणांनी जाहीरपणे आपली व्यथाही मांडली आहे. अशा वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार संदीप जोशी यांनी ‘राजसंन्यास’ घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नागपूरमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापौर, स्थायी समिती सभापतीपद आणि आमदार अशी पदे भूषविणारे जोशी तसे पाहायला गेले तर असंतुष्ट असण्याचे कारण दिसत नाही. तरी त्यांनी हा निर्णय घेतला याचे आश्चर्य वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या कथित संन्यासाचा अंदाज येतो. सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा, निष्ठावान कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरली असावी, असा अंदाज आहे. कुठेतरी थांबायला हवे, अशी तीव्र भावना त्यांच्या मनात आली असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
श्री.जोशी यांच्या अवस्थेचे वर्णन करताना उद्विग्न हा शब्द समर्पक ठरेल. विशेषत: त्यांनी ज्या चार काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत त्या लक्षात घेतल्या जर जोशींच्या मनात मोठी खदखद या निवडणुकीत निर्माण झाली असावी.
‘कुर्सी नही कीमत बचाने चला हूँ,
शोर नही सुकून चुनने चला हूँ,
किसी और की राह रोशन हो सके,
इसलिए खुद एक कदम पीछे हटा हूँ
या आत्मक्लेशामागची कारणे शोधली तर सापडतील. भाजपा नेत्यांना उमेदवारी डावललेल्या कार्यकर्त्यांना समजून घ्यावेच लागेल. महापालिका निवडणूक जर कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे बोलले जात असेल तर या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू असलेल्या कल्लोळाचा विचार करावाच लागेल.
जोशी यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भाजपा नेतृत्वाला त्याची गंभीर दखल घ्यावीच लागेल. विजयाच्या जल्लोषात हा संवेदनशील मुद्दा बाजूला सारला जाण्याची शक्यता अधिक आहे. जे नेते कार्यकर्त्यांशी फटकून वागतात त्यांची अवस्था काय होते हे या निवडणुकीत दिसलेच. काही पराभूत उमेदवारांना स्वकीय नेत्यांनीच पाडण्याचे काम केले असे वाटत आहे. अशा नेत्यांबद्दल आगामी काळात किती आदर राहील हे सांगता येणार नाही. विजयी उमेदवार सर्वांनाच आवडतात, परंतु ज्यांना तिकीट नाकारले आणि बंडखोरी करुन पराभवास सामोरे जायला लावले, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीवरून हातही फिरवला जात नसेल तर राजकारण खूपच निर्दयी आणि मतलबी झाले आहे, असेच म्हणावे लागेल.
संदीप जोशी को गुस्सा क्यो आया, ह प्रश्न नागपूरपासून राज्यातील गल्लीबोळातील असंख्य संदीप जोशी विचारत आहेत. त्यांना उत्तर कोणी देणार आहे की नाही?