मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणारे ठाणे महापालिका प्रशासन आणि ही महापालिका चालवणारे लोकप्रतिनिधी ही यंत्रणा एखाद्या जलवाहिनीची दुरुस्ती निघताच कशी उघड्यावर पडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कधी देखभालीसाठी तर कधी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद केला जातो आणि अशावेळी टँकर लॉबी आपली पोळी भाजून घेते हे सत्य ठाणेकरांच्या अंगवळणीस पडले आहे. सध्या त्याचा अनुभव घेतला जात आहे. परंतु त्याही उपर पाणी खात्याचा एक वरिष्ठ अधिकारी जलवाहिनी किती खोल आहे आणि नेमकी कुठे गळत आहे हे शोधावे लागेल असे सांगत असेल तर हा महत्वाचा विभाग आपण रामभरोसे चालवतो काय असा प्रश्न पडतो. वास्तविक तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असताना आणि समस्येचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी अद्ययावत यंत्रे असताना हा प्रश्न का पडावा, हाच खरा कळीचा मुद्दा आहे!
जगभरातील (प्रगत देशांमध्ये) जमिनीवरील नागरी सुविधांचे जसे आराखडे असतात तसे भूगर्भाखालील सेवा देणाऱ्या वाहिन्यांबाबतचे नकाशे असतात. त्यामुळे दुरुस्ती करताना ‘शोधमोहीम’ घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे वेळ तर वाचतोच परंतु अंदाजपंचे खड्डे खणून रस्त्यांची दुर्दशा करण्यासही लगाम लागतो. ठाण्यात अशी व्यवस्था का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
जमिनीखालील सेवांबाबतचा तपशील असणे आवश्यक आहे कारण अशा सेवा, मग ती गॅसपुरवठा असो की वीजपुरवठा करणाऱ्या सेवांवर अकारण खड्ड्यांमुळे विपरीत परिणाम होत असतो. आता तर मेट्रोही जमिनीखालून जाते. अनेकदा उत्तन मार्गासाठी जमीन खणून खांब उभे करावे लागतात. ही कामे करताना जमिनीखालच्या वाहिन्या, मग त्या पाण्याच्या, गॅसच्या किंवा वीजेच्या असोत, त्यांना इजा होऊ नये यासाठी तर नकाशे लागतातच. ठाणे महापालिकेकडे ते नसतील तर अभियांत्रिकी विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. याबाबत काही अभियंत्यांनी त्यांच्या अडचणी विषद केल्या. उदाहरणार्थ जी वाहिनी फुटली आहे ती सिमेंटची आहे आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी लागणारे विशिष्ट साहित्य उपलब्ध होत नसते. आधुनिक यंत्रे लोखंडी जलवाहिनीतील बिघाड ओळखू शकतात, परंतु सिमेंटच्या वाहिनीचा नाही. हा खुलासा क्षणभर मान्य केला तरी महापालिका जमिनीखालच्या वाहिन्यांबाबत अद्ययावत नाही हे स्पष्ट होते. सिमेंट काँक्रीटीकरण करताना या सर्व सेवा रस्त्याच्या कडेला घेण्याचे ठरले होते. तसे झाले असते तर ठिकठिकाणी खड्ड्यांसाठी खणकाम झाले नसते. पाणीपुरवठा बंद राहणार तर त्याची तजवीज का केली जात नाही, हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.