गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या क्लबला परवानगी नव्हती आणि अग्निसुरक्षितेबाबत खबरदारीही घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. यामुळे दु:खाला संतापाची किनार लागली आहे. हा डिसेंबर महिना असून नाताळ ते नववर्षाचे स्वागत यासाठी देशातील सर्वच उपहारगृहे आणि रिसॉर्टस्मध्ये जल्लोष होत असतो, त्यास गालबोट लागू नये याचा जणू इशाराच या दुर्घटनेने दिला आहे.
पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून गोव्याची देशात आणि देशाबाहेर ख्याती आहे. या घटनेमुळे या लौकिकास बाधा येऊ शकते. गोव्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे अशी दुर्घटना होऊ नये याकरिता विशेष काळजी घेण्याची गरज होती. त्यादृष्टीने गोवा सरकार हे अडचणीत आले आहे आणि म्हणूनच या नियमबाह्य क्लबमधील अन्य उल्लंघनांची दखल घेऊन कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. गोव्यातील सर्वच नाईट क्लब आणि रिसॉर्टची झाडाझडती घेतली जाणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन खपवून घेतले जाता कामा नये, असे सक्त आदेश देण्याची गरज आहे.
गोव्यात पर्यटकांची विक्रमी गर्दी पुढील काही दिवस होणार आहे. या गर्दीला सेवा देण्यासाठी हॉटेलमालकांमध्ये चढाओढ लागली आहे. हॉटेलमध्ये सजावट करताना ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी असा कल असतो. त्यात गैर नाही. भारतीय मंडळी मोठ्या प्रमाणात परदेशी जात असल्यामुळे त्यांच्या अभिरुचीला साजेशी सजावट केली जाते. परंतु ती करताना सुरक्षिततेचे नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे. आग लागलेल्या नाईट क्लबमध्ये बाहेर पडण्याचा मार्ग चिंचोळा होता. तिथे चेंगराचेंगरी झाली. ही त्रुटी ठाणे-मुंबईतील अग्निशमन दलांनी लक्षात घेऊन सर्व हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी किमान दोन दरवाजे असावेत अशी अट सक्तीची करावी लागेल. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक ग्राहकांना सामावून घेतले जाते. त्यामुळे धोक्याची शक्यता वाढत जाते. या मर्यादेकडेही अग्निशमन दलाला लक्ष ठेवावे लागेल.
काही वर्षांपूर्वी मुंबईत कमला मिल कंपाऊंडमधील एका उपहारगृहास अशीच आग लागली होती. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. तत्कालिन आयुक्त आणि महापौर यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्या घटनेतही नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. आज ठाणे-मुंबई परिसरात हॉटेलला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पूर्वी शनिवार-रविवार या दोन दिवशी हॉटेलात जागा मिळणे कठीण जात. आता शुक्रवारपासून गर्दीचा ओघ सुरू होतो आणि काही उपहारगृहांत तर आठवडाभर अलोट गर्दी बघायला मिळते. यामुळे आर्थिक उलाढाल वाढली असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. परंतु मजा करायला आलेल्या नागरिकांना त्यांच्या नकळत मृत्यूच्या दाढेत ढकलणे निश्चितच निषेधार्ह ठरते. आज ठाण्यात बेकायदा हॉटेलचे पेव फुटले आहे. दर्शनी भाग आकर्षित ठेवायचा आणि मागच्या बाजूला नियमबाह्य बांधकाम करुन मृत्यूचे सापळे रचले जात आहे. ठाण्याच्या अग्निशमन दलाने या बेदरकार हॉटेल चालकांना वेळीच आवरायला हवे.