जेव्हा राजकीय सोयीसाठी भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात यथावकाश हा दुरावा निर्माण होणारच असतो. त्याचा अनुभव सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना येत असेल तर आश्चर्य वाटू नये. भाजपाच्या विचारधारेपासून दूर असणारे पवार-शिंदे यांचे पक्ष सत्ताकारण सोडल्यास कोणत्याच समान सूत्रांत बसणारे नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपा काँग्रेसबरोबर जाते तर पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे दोघे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवतात. महायुतीचा अंत समीप आला आहे अशी भीती व्यक्त होत असली तरी ती वेळ भाजपाच ठरवेल असे वाटते.
सिंचन घोटाळ्याचे भूत पवारांच्या मानगुटीवरुन उतरण्याचे नाव घेत नाही आणि त्यातून भाजपा नेते त्यांच्यावर थेट हल्ला करु लागले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कथित घोटाळ्याचा उल्लेख केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. महायुतीमधील घटक पक्ष राज्यांत एकत्र येतात आणि स्थानिक निवडणुकीत स्वतंत्र बाणा जपतात. याबद्दल जनतेच्या मनात संदेहाची भावना पसरली आहे. त्याचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर झाला नाही तरच नवल. मुळात स्थानिक निवडणुका मुद्यांवर लढल्या जातात. तसेच उमेदवाराची लोकप्रियता, उपयुक्तता आणि व्यक्तीमत्व यावर मतदारांचा भर असतो. पक्षीय पसंतीला दुय्यम स्थान असते. चांगला उमेदवार आवडीच्या पक्षाचा असेल तर अधिकच उत्तम. परंतु तसे होतेच असे नाही. त्यामुळे पक्षांची गरज भासते. अर्थात वाईट उमेदवाराला पक्षाच्या कुबड्या लागतात असेही म्हणता येणार नाही. काही वेळा पक्ष चांगले उमेदवार उभे करतो. उमेदवाराचे चांगले-वाईटपण त्याचे व्यक्तीगत असते आणि पक्षाचा प्रवेश सत्तेचे गणित जुळवताना होतो.
आज पवार आणि शिंदे यांच्याबरोबर भाजपाचे वाद आहेत. परंतु निवडणुकीनंतर पुन्हा त्यांना एकमेकांची गरज लागली की ते एकत्र येतील! मग कसला भ्रष्टाचार, कसले सेक्युलिरिसम आणि कोणता समंजसपणा. सर्व झूठ असते. अशा खोटेपणाला मतदार कंटाळून गेले तरी नेते काही एकमेकांशी भांडायचे थांबत नाहीत.