चला संकल्प करूया..  चांगले नगरसेवक निवडूया ! 

नवे वर्ष, नवा संकल्प असे सहज बोलले जाते परंतु त्याला कृतीची जोड नसल्याने हे चार शब्द अर्थहीन होऊन जातात. कालचक्र फिरत राहण्यामागे मनुष्याचे योगदान नसते, त्यामुळे सरणारे वर्ष हे आपोआप नवे होत जाते आणि ही सापेक्षता युगानुयुगे सुरू आहे. नाही म्हणायला हे कालचक्र थांबवण्याचा प्रयत्न कोरोना महामारीने केला. परंतु मानवाने त्याच्या कुशाग्र बुद्धीने विषाणूंचा बंदोबस्त करून आपले अस्तित्व चिरंतर ठेवले ! मानवी जीवनाचे मूल्य तरीही काही जणांना समजलेले नाही आणि असे लोक महासंहारक युद्ध करून कालचक्र कायमचे थांबवण्याचा अनाकलनीय प्रयत्न करीत आहेत. ही पृथ्वी सर्वांची आहे, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मान्य न करणारे राक्षसी महत्त्वाकांक्षेने इरेला पेटले आहेत. आजही सुमारे ८30 कोटी नागरिक काही मूठभर हुकूमशहांच्या मर्जीवर जीवन कंठीत आहेत.

जगाचा भार पेलण्यास पृथ्वीला कठीण जात आहे. हिंसाचार, अतिरेक्यांचा उपद्रव, सत्तासंघर्ष, आर्थिक कोंडी करण्याची राष्ट्रप्रमुखांची विकृती आणि एकूणच अनैतिकता आणि अमानवी वागण्याची स्पर्धा यामुळे मानवतेलाच धोका उत्पन्न झाला आहे. भरीसभर हवामानातील बदल, अंमल पदार्थांचा अंमल, विकासाच्या नावाखाली राजरोसपणे सुरू असलेला उत्पात यामुळे आनंद आणि समाधान यांना मानवजात वंचित राहू लागली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील व्यापकता आणि उदात्त हेतू यांची जागा संकुचित वृत्तीने घेतली आहे आणि देशांमधील सीमा पुसल्या जाण्याऐवजी अधिक बळकट बनत चालल्या आहेत. अमेरिकेसारख्या देश परदेशी नागरिकांना जाचक नियमांनी जखडून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि अन्य काही देशात परकीय देशांमधील नागरिकांना हिंसेस सामोरे जावे लागत आहे. जगातून सुसंस्कृतपणा, संयम आणि बंधुभाव नष्ट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशावेळी आपली भारतीय म्हणून असणारी भूमिका महत्त्वाची ठरते. १४७ कोटींच्या या देशाकडे सारे जग मोठ्या अपेक्षेने पहात आहे. त्यात कुतूहल तर आहेत परंतु भयमिश्रित कौतुकही आहे. म्हटले तर आपण आर्थिकदृष्ट्या महासत्ता होण्यापासून खूप दूर आहोत परंतु मनुष्यबळात आपण अग्रेसर आहोत. आपली ताकद आपल्या हुशारीत आहे तशी ती लोकशाहीतही आहे. स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंत आपण मतदान करून लोकप्रतिनिधी निवडत असतो. त्यांच्या हातात आपण देशाचे भवितव्य सोपवत असतो. महाराष्ट्रातील जनतेने नगरपरिषदांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून दिले. आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी नवीन वर्षात आपण उत्तम आणि जबाबदारी निवडण्याचा संकल्प सोडूया. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांचे आपले जीवन सुरक्षित आणि सुंदर होणार आहे.