व्याख्यानमाला : खऱ्या बुद्धिमत्तेची खाण

जिल्ह्याचे सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठ असा लौकिक प्राप्त केलेले ‘ठाणेवैभव’ त्या लौकिकास साजेसे उपक्रम राबवत असतो. ‘ठाणेवैभव’कार कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला हा त्याचाच एक भाग. या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाची सुरुवात श्रीरंग-वृंदावन सहनिवास परिसरातील श्रीरंग विद्यालयात ॲड. माधवी नाईक यांच्या पुढाकाराने झाली. ॲड. नाईक यांच्या अर्थ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने व्याख्यानमाला कोव्हिडचा आघात होईपर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत १३ वर्षे अखंड सुरु होती. सिने-नाट्य, साहित्य-पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ठाण्यात येऊन त्यांचे विचार मांडले होते. ठाणेकरांनी त्यास भरघोस प्रतिसाद दिला होता. अशी ही व्याख्यानमाला ६ मार्च रोजी कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मृतीदिनी पुन्हा सुरु होत आहे.

ठाणेकरांमध्ये लोकप्रिय झालेल्या या व्याख्यानमालेतील नामवंतांचे विचार ऐकणे ही वार्षिक बौध्दिक मेजवानी झाली होती. ती पुन्हा सुरु करा अशी मागणी काही दिवसांपासून होत असल्याने अखेर ती आयोजित होत आहे.ठाणे शहरात विचारवंत आणि जागरुक नागरीकांचा सक्रीय समुह असावा, ही आमची नेहमीच अपेक्षा राहिली आहे. शहराच्या जडणघडणीत आणि निर्णय प्रक्रियेत अशा नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टीने आम्ही सातत्याने विविध घटकांना एकत्र आणत असतो. डॉक्टरांची संघटना असो की चार्टर्ड अकाउंटंट, वास्तूविशारद, उद्योजक, दुकानदार, पर्यावरण स्नेही, कलाकार, संगीतकार, वाचनकट्टे, योगवर्ग, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत संघटनांना ठाणेवैभव केवळ प्रसिद्धी देऊन थांबले नाही तर त्यांच्या उपक्रमात सहभागीही होत असते. अशा संस्थांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शहराबद्दल तळमळ जाणवल्यामुळे आम्ही त्यांना एका व्यासपीठावर वारंवार आणत असतो.

‘ठाणेवैभव’चा विश्वास आहे की समाज हा सकारात्मक आणि सक्रीय असायला हवा. त्याला अर्थात पुरक विचारांची जोडही हवी. उत्तम वक्ते आणून विविध क्षेत्रांची माहिती, त्याचे विश्लेषण, अनुभव-कथन वगैरे मौल्यवान विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवून आम्ही ते साध्य करीत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी मेंदू आणि त्याच्या क्षमतेचा ऱ्हास होईल अशी चिंता व्यक्त होत असताना व्याख्यानमाला खऱ्या बुद्धिमत्तेला चालना देईल. मेंदूचे चलनवलन सुरू राहील.
यंदाच्या व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध लेखक श्री. दीपक करंजीकर आणि ख्यातनाम नाट्यदिग्दर्शक आणि कादंबरीकार श्री. अभिराम भडकमकर पुष्प गुंफणार आहेत. श्री. करंजीकर हे २१ व्या शतकाचे भूराजकीय प्रतल आणि भारत या विषयावर बोलणार आहेत. तर श्री. भडकमकर चरित्र कादंबरी-इतिहास की विपर्यास यावर विवेचन करतील. या दोघांनी आपल्या समृद्ध लिखाणातून एक नवा दृष्टिकोन समाजाला दिला आहे. त्यांचे थक्क करणाऱ्या साहित्याने वाचकांस भुरळ घातली आहे . त्याची प्रचिती त्यांचे विचार ऐकताना ठाणेकरांना नक्कीच येणार आहे.चोखंदळ ठाणेकरांच्या अभिरुचीचा सन्मान ठाणेवैभव करीत असतो. ही व्याख्यानमाला त्याचे द्योतक आहे.

उत्तम वाचावे आणि ऐकावे ही पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा व्याख्यानमालांनी जीवंत ठेवली होती. ‘ठाणेवैभव’च्या माध्यमातून आम्ही त्यास हातभार लावत आहोत. छोट्या पडद्यावरुन डिजिटल क्रांतीने माहितीचा धबधबा घरोघरी पोहोचवला खरा, पण विचाराचे सोने तयार होण्यासाठी चिंतन-मनन लागते आणि हे काम व्याख्यानमाला चोख बजावत आहेत.

आज 6 मार्च असून ठाणेवैभवकार नरेंद्र बल्लाळ याचा 32 वा स्मृतीदिन आहे. या दिवशी त्यांच्या नावाने सुरु झालेल्या उपक्रमाचे पुनरुज्जीवन होत असल्याबद्दल आम्हाला विशेष समाधान आहे.