डम्पिंग मोकळे होणार; जागेवरून संघर्ष वाढणार

ठाणे : दिवा डंपिंग कायमचे बंद करुन जमीन पूर्ववत करून देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. ही जमीन मोकळी झाल्यानंतर यावर हक्क कोणाचा यावरून आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यात या दाव्या-प्रतिदाव्यांवरून मोठा संघर्ष उडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

जमीन मोकळी करून देण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका २५ कोटींचा खर्च उचलणार आहे. दीड वर्षानंतर मोकळ्या होणाऱ्या या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे.

मागील कित्येक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा येथील क्षेपणभूमीवर कचरा टाकला जात होता. याठिकाणी रोजच्या रोज सुमारे एक हजार मेट्रीक टन कचरा टाकला जात होता. आता मागील काही महिन्यापासून येथील डम्पींग कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून येथे कचरा टाकला जात असल्याने आजही येथे धुराचे लोळ उडतांना दिसत आहेत. त्यातही याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे डम्पींग बंद झाले असले तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही.

येथील डम्पींग कायमचे बंद झाल्यानंतर येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या हालचाली पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या ठिकाणी सध्या ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

एकीकडे वनविभागाने जागा आपली असल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच संघर्षाची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे.