भाडेवाढीमुळे जुन्या साडेचार कोटी तिकिटांसह पास वाया

साहित्य जाळून नष्ट करण्याचा प्रस्ताव

ठाणे: भाडेवाढीमुळे ठाणे परिवहन सेवेच्या साठा विभागात मागील जवळपास दोन दशकांपासून पडून असलेली कोट्यवधी बस तिकिटे आणि हजारो पास वाया जाणार असून ते जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

भाडेवाढीनंतर ही तिकिटे वापरात येण्याची शक्यता नसल्याने साठा विभागात जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कळवा आणि वागळे आगारात पडून असलेली जुनी तिकिटे आणि पासेसची विल्हेवाट लावण्याचा प्रस्ताव करण्यात तयार आला असून तो १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

यानुसार टीएमटीकडील चार कोटी ६३ लाख ८५,५३७ तिकिटे तसेच विविध पास जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीएमटीच्या वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठा विभागात विविध दरांची बस तिकिटे आणि पास दीर्घकाळापासून वापरात नसल्याने पडून आहेत. यामध्ये २००७ ते २००८ या कालावधीतील एक कोटीहून अधिक तिकिटांचा समावेश आहे. २०१५ मध्ये परिवहन सेवेचे भाडे वाढवण्यात आल्यानंतर ही तिकिटे आणि पास पुढे वापरणे शक्य राहिले नाही. परिणामी हा मोठा साठा जागा व्यापून पडला असून साठा विभागात जागेची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच दीर्घकाळ पडून राहिल्याने कागदी तिकिटे खराब होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, या प्रस्तावाला परिवहन व्यवस्थापकांनी मान्यता दिली आहे. मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणे परिवहन सेवेने पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकिटांची छपाई का केली, असा प्रश्न उपस्थित होत असून त्या खर्चाचा मोठा भाग आता वाया जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

परिवहन सेवेच्या साठ्यातील नष्ट करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये चार कोटी ६३ लाख ८५,५३७ तिकिटे, ७१,४०८ विविध पास, १३,२०२ ओळखपत्रे आणि १४,५४५ अर्ज यांचा समावेश आहे. यामध्ये एप्रिल २००७ ते एप्रिल २००८ या कालावधीतील एक कोटी ९८ लाख ९०,४७५ तिकिटे, ३१ मार्च २०१५पूर्वी रद्द करण्यात आलेली एक कोटी सात लाख तिकिटे, कळवा आगारातील २४ लाख ७४,१०० आणि वागळे आगारातील एक कोटी २४ लाख ८५,५०० तिकिटांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ७१ हजार विद्यार्थी सवलत व प्रवासी पास देखील नष्ट केले जाणार आहेत.