झमॅटो डिलिव्हरीच्या आड अमली पदार्थांची तस्करी

दोन घटनांत चार कोटींची एम डी पावडर हस्तगत

ठाणे: झमॅटो डिलिव्हरीच्या आडून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या झमॅटो कर्मचाऱ्यांसह दोन जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून सुमारे चार कोटींचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

इरफान शेख (३६) आणि शाहरुख मेवासी उर्फ रिजवान (२८)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली विरोधी पथकाचे पोलिस हवालदार हरीश तावडे यांना माहिती मिळाली होती कि झमॅटोच्या व्यवसायाआड एक आरोपी एमडी या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी शिळफाटा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी २७ जुलै रोजी संध्याकाळी ५. ४५च्या दरम्यान दिवा गावाकडे जाणाऱ्या शिळफाटा नाका येथिल वेलफेयर केमिस्ट या दुकानासमोर सापळा रचून झमॅटोचा कर्मचारी इरफान शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये तीन कोटी पाच लाख रुपये किमतीचे एक किलो ५२२ ग्राम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या आरोपीला न्यायालयाने ३१ जुलैपर्यन्त पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसऱ्या घटनेत ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना खारीगाव टोल नाका येथून एक जण अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २४ जुलै रोजी सापळा रचून शाहरुख मेवासी उर्फ रिजवान याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून ९२ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा ६६२ ग्राम वजनाची एमडी पावडर पोलिसांनी जप्त केली. या आरोपीला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.