ठाणे: कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा (शिळफाटा) ते भिवंडीजवळील आग्रा महामार्गावरील राजनोलीपर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ठिकाणी डबर डेकर उन्नत मार्ग उभारणीसाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या चार पदरी डबल डेकर उन्नत मार्गावरून एकाच वेळी मेट्रो आणि रस्ते वाहतूक होणार आहे.
कोणत्याही कोंडीशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागातले वर्दळीचे चौक टाळून या मार्गाने शिळफाटा ते थेट भिवंडी असा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ५९०९.२१ कोटी इतका असून त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या उन्नत मार्गाची एकूण लांबी १९.४० किलोमीटर इतकी आहे. याची सुरूवात कल्याणफाटा (शिलफाटा जंक्शन) पासून होऊन कटई नाका, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे भिवंडीतील राजनोली जंक्शन येथे समाप्ती होईल.
या मार्गाचा समावेश ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५, कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ या दोघांशी होईल. तसेच कल्याण-तळोजा मेट्रो १२ अ या विस्तारीत मार्ग आणि कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ या प्रस्तावीत मेट्रो मार्गांशीही याचे समन्वय केले जाणार आहे.
कसा असेल उन्नत मार्ग
या उन्नत मार्गामध्ये पहिल्या स्तरावर वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गावर आठ ठिकाणी प्रवेश (इंट्री) आणि निर्गमन (एक्झिट) रस्ते (रॅम्प) प्रस्तावित आहेत. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल (पलावा-दिवा पनवेल आणि पत्री पूल क्रॉसिंग) तसेच दोन प्रमुख पूल, देसाई खाडी आणि उल्हास नदी (दुर्गाडी परिसर) प्रस्तावित आहेत.