ठाण्यात डबल डेकरची वाट चुकली

फायद्याचे मार्ग शोधण्याची पाळी

ठाणे: मुंबई महानगराप्रमाणेच ठाण्यातील रस्त्यांवर डबल डेकर बस धावणार असल्याने ठाणेकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, मात्र काहीच दिवसांत रस्त्यांवर धावू लागलेल्या या बसकडे ठाणेकरांनी पाठ फिरवल्याने परिवहन सेवेची निराशा झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता फायद्याच्या मार्गांचा शोध सुरू झाला आहे.

सध्या २२ नंबर सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर धावणाऱ्या या डबल डेकर बसला अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने परिवहन प्रशासनाने सेवा अधिक वर्दळीच्या मार्गावर वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पूल ते घोडबंदर परिसर या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रायोगिक फेरी घेऊन व्यवहार्यता तपासली जाणार आहे. या चाचणीनंतरच नियमित सेवा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवे रूप देण्याच्या उद्देशाने दोन वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस टीएमटीच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. मात्र सध्या त्या केवळ सकाळी ८ ते १२ आणि दुपारी २ ते ६ या वेळेत २२ नंबर सर्कल-भाईंदरपाडा मार्गावर धावत आहेत. या मार्गावर अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नसल्याने बसचा खर्च आणि उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बसमधून दिवसाला केवळ तीन ते चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असून, सेवा आर्थिकदृष्ट्या टिकाऊ ठरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकाशी थेट जोडणी असलेल्या सॅटिस पूल येथून सेवा सुरू करण्याचा पर्याय पुढे आणला आहे.

ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या बस टर्मिनसपैकी सॅटिस पूल हा प्रमुख केंद्रबिंदू आहे. येथून घोडबंदर मार्गाकडे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे डबल डेकर बस या मार्गावर आणल्यास रेल्वे स्थानकातून थेट घोडबंदरकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्याय उपलब्ध होईल, तसेच घोडबंदर परिसरातून स्थानकात येणाऱ्यांचीही सोय होईल. याचा थेट परिणाम प्रवासीसंख्या आणि उत्पन्न वाढण्यावर होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

नियमित सेवा सुरू करण्यापूर्वी बसच्या उंचीमुळे कोणत्याही ठिकाणी अडथळे निर्माण होणार नाहीत याची खात्री केली जाणार आहे. उड्डाणपूल, विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, वाहतूक व्यवस्था आणि वळणांचा अभ्यास करण्यासाठी रात्रीच्या वेळी सॅटिस पूल ते घोडबंदर मार्गावर प्रायोगिक फेरी काढली जाणार आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास त्यानंतर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नियमित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

चार डबल डेकर बस लवकरच

टीएमटीच्या ताफ्यात लवकरच आणखी चार वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार आहेत. या बस पवारनगर, हिरानंदानी इस्टेटसह शहरातील अंतर्गत मार्गांवर चालविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच मुंब्रा-शिळफाटा ते खारीगाव या मार्गावरही भविष्यात डबल डेकर सेवा सुरू करण्याची तयारी परिवहन प्रशासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.