मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेकायदा बाईक टॅक्सी संदर्भात विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली. बाईक टॅक्सीकडून दररोज पाच रुपये सरकारला मिळतील, याशिवाय राईडच्या दोन टक्के रक्कम सरकारला मिळेल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. याशिवाय राज्यातील डोमिसाईलधारक तरुणांना परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले. आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत यासंदर्भातील मुद्दा मांडला होता.
बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिले. रॅपिडो ओला उबरने पेट्रोल बाईक रस्त्यावर आणलेल्या आहेत. सध्या चार ते साडेचार लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर आहेत. बाईक टॅक्सीवाल्यांकडून सरकार पुढील काळात कर देखील वसूल करणार आहे. रोज पाच रुपये आणि राईड रकमेतील दोन टक्के रक्कम देखील सरकारला मिळेल. राज्यामधल्या मुलांनाच बाईक टॅक्सी चालवू देणार असे देखील प्रताप सरनाईक म्हणाले.
चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी सभागृहात अवैध वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात अनधिकृत बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्यासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. ॲप बाईकवाले नशा करून गाड्या चालवतात, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केला. प्रताप सरनाईक यांनी महसूल वाढवायला काही कंपन्याना परवानगी देण्यात आली होती, असे सांगितले. विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना केल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रताप सरनाईक म्हणाले की रॅपिडो,ओला, उबेर यांना आम्ही ई-बाईक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली होती. पण त्यांनी सर्रास पेट्रोल बाईकही रस्त्यावर आणल्या. त्यांच्यावर आम्ही कारवाई सुरू केली
बाईक टॅक्सीला प्रत्येक दिवशी पाच रूपये आणि राईडच्या रकमेतील दोन टक्के रक्कम सरकारला द्यावी लागेल. तसेच केवळ राज्यातील मुलांना काम मिळावे म्हणून डोमिसाईल असलेल्यांना याची परवानगी दिली जाणार आहे. बाईकना २५ किमी वेगाने बाईक चालवण्याची परवानगी आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एप्रिल 25 ते मार्च 26 पर्यंत तब्बल 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिलपासून मेपर्यंत 2.3 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या सव्वा वर्षात एक हजार वाहने दोषी आढळली आहेत. यापैकी फक्त 14 वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.