हाय टाईडमुळे जिल्ह्याला ३८ दिवस धोक्याचे

१५ जुलैला सर्वाधिक ४.८६ मीटरची उंच भरती

ठाणे: महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने जुलै ते सप्टेंबर या काळातील हाय टाईडचे वेळापत्रक जाहीर केले असून तब्बल ३८ दिवस समुद्र व खाडीला मोठी भरती येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील परिसरासाठी हे दिवस संवेदनशील मानले जात आहेत.

ठाणे, कळवा, मुंब्रा, कोलशेत तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडीकिनारी सखल भागांमध्ये भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, रस्ते जलमय होणे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महापालिकांनी पंपिंग स्टेशन, नाले आणि जलनिस्सारण यंत्रणेची पाहणी सुरू केली असून, हाय टाईडच्या दिवसांत विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. विटावा, कळवा, मुंब्रा रेतीबंदर तसेच कल्याण परिसरातील खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मच्छिमार आणि पर्यटकांनी या काळात समुद्र व खाडी परिसरात जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जुलै ते सप्टेंबर दरम्यान ३८ दिवस भरती येणार आहे. जुलैमध्ये ११, ऑगस्टमध्ये १४ आणि सप्टेंबरमध्ये १३ दिवस चार मीटर उंची पेक्षा मोठी भरती राहणार आहे. यातील सर्वाधिक उंचीची भरती १५ जुलै रोजी दुपारी २.२१ वाजता येणार असून, लाटांची उंची ४.८६ मीटर इतकी असेल. तसेच १३ ऑगस्ट रोजी ४.७१ मीटर, तर ११ सप्टेंबर रोजी ४.४८ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे.

महिनावार भरतीचे दिवस
जुलै: १, २, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, ३१, ऑगस्ट: १, २, ३, १०, ११, १२, १३, १४ (दोन वेळा), १५ (दोन वेळा), १६ (दोन वेळा), १७, ३०, ३१, सप्टेंबर: १, ८, ९, १०, ११ (दोन वेळा ), १२ दोन वेळा), १३ (दोन वेळा), १४ (दोन वेळा), १५, २७, २८ (दोन वेळा), २९ (दोन वेळा), ३०.