अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील विद्यार्थ्यांची ‘मिशन भरारी’
अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वसार येथील शाळेतील तनय वायले आणि विदिशा वायले तसेच कल्याण तालुक्यातील नडगाव येथील शाळेचा विद्यार्थी प्रथमेह सोनावळे या विद्यार्थ्यांनी इस्रोकडे झेप घेतली आहे. मिशन भरारी अंतर्गत या विद्यार्थ्यांना थेट इस्त्रोच्या केंद्राला भेट देऊन अंतराळ विज्ञानाचे धडे गिरवता येणार आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी मिशन भरारी अंतर्गत निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. अतिशय कठीण स्पर्धा आणि अवघड टप्प्यातून तनय वायले आणि विदिशा वायले या दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे स्थान निश्चित केले. इस्त्रोच्या केंद्राला भेट देणारे तनय आणि विदिशा हे वसार गावातील पहिले दोन विद्यार्थी असून थेट इस्त्रोच्या केंद्राला भेट देऊन अंतराळ विज्ञानाचे धडे गिरवणार आहेत.
तालुका आणि जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तीन स्तरांवर घेण्यात आली होती. केंद्रस्तरावर 23 जानेवारी 2026, तालुकास्तरावर 28 जानेवारी 2026 आणि जिल्हास्तरावर 31 जानेवारी 2026 रोजी परीक्षा पार पडली. मिशन भरारी अंतर्गत झालेल्या परीक्षेत अंबरनाथ तालुक्यातून 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये उर्दू माध्यमाच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये आठ विद्यार्थिनींचा समावेश होता.
गट शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर, विस्तार अधिकारी जतकर, विस्तार अधिकारी शिद, पाटील, यांच्याप्रमाणे केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापिका मोहिनी बागुल, वर्गशिक्षक खंबायत आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धेची तयारी करवून घेतली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक, अंबरनाथ एमआयडीसीमधील एएसबी कंपनीचे विशेष सहकार्य लाभले.
मिशन भरारी स्पर्धा परीक्षेत कल्याण तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रथमेश सोनावळे या विद्यार्थ्याने देखील उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमेश सोनावळे याची द्वितीय क्रमांकाने निवड झालेली आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रथमेशच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा मिळाली आहे.
जिल्हास्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 27 एप्रिल ते 1 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव घेत इस्रोला भेट देण्याची संधी मिळणार आहे.