रिक्षा रांगेत, फेरीवाले गायब ठामपा-पोलिसांची छडी वाजली
ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांना आणि फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. सध्या रिक्षा चालक रांगेत आणि शिस्तीने व्यवसाय करताना दिसत असून फेरीवाले १५० मीटरच्या परिघाबाहेर पसार झाले आहेत. स्थानक परिसरात आता अनुशासन पर्व सुरू झाले असून ठाणेकर सुखावले आहेत.
मागील काळात रेल्वे स्थानक परिसरात काही रिक्षा चालकांची दादागिरी वाढली होती. जवळचे भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणे, रांगेतून न येणे असे प्रकार सुरू होते. त्याचबरोबर परिसरात फेरीवाल्यांनी साम्राज्य उभे केले होते. महापालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांचे आर्थिक संबंध असल्याने फेरीवाल्यांच्या विरोधात तात्पुरती कारवाई केली जात होती. फेरीवाल्यांनी पदपथ तसेच रस्ते देखील गिळंकृत केले होते, त्यामुळे ठाणेकरांना कामावरून आल्यानंतर रस्त्याने नीट चालताही येत नव्हते. अनेक प्रवाशांनी तसेच माजी नगरसेवक संजय वाघूले यांनी देखील महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन मागील महिन्यात ठाणे पोलिसांची मदत घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने रिक्षा चालकांना शिस्त लावली तर रेल्वे स्टेशनपासून १५० मीटरच्या अंतरावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
सकाळ-संध्याकाळ या दोन सत्रात कर्मचारी नियुक्ती करण्यात आले तसेच वाहतूक पोलीस आणि नौपाडा पोलीस तैनात करण्यात आले, त्यामुळे मागील महिनाभर स्टेशन भागात रिक्षाचालक शिस्तबद्धरित्या प्रवाशांना सेवा देत आहेत तर फेरीवाल्यांच्या विळख्यातून ठाणेकर सुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात स्थानक परिसरातील फेरीवाले आणि रिक्षा चालक यांच्या बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये यापुढे दोन्ही सत्रात रात्री १२ वाजेपर्यंत बंदोबस्त ठेवण्यावर एकमत झाले आहे.
या बैठकीला महापालिका आयुक्त अभिजित बांगर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड, परिमंडल एक चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त जे.जे.गोदापुरे आदी उपस्थित होते.