प्रभाग रचनेवर नापसंती; ठामपात मुसळधार हरकती

अखेरच्या दिवशी २०० हरकती दाखल

ठाणे: गेले काही दिवस गणेशोत्सवाच्या धामधुमीत ठाणे महापालिकेच्या प्रभाग प्रारूप आराखड्याकडे जागरूक नागरिक, संस्था आणि पक्ष कार्यकर्त्यांनी पाठ दाखवली होती, मात्र आज शेवटच्या दिवशी तब्बल २०० हरकती दाखल करत ठाणेकरांनी आराखड्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विशेषतः दिव्यासारख्या भागात लोकसंख्येचा समतोलपणा प्रभागात पाहायला मिळत आहे, त्यामुळे येथील विरोधी गटही आक्रमक झाला आहे.

आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यानंतर आता या प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती नोंदविण्याची शेवटची मुदत ४ सप्टेंबर असून या एका दिवशी सुमारे २०० हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत २६१ हरकती नागरिकांनी नोंदविल्या असल्याचे दिसून येत आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत.

गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचे बोलले जात होते. गौरी-गणपती विसर्जन होताच, या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे ३ सप्टेंबर रोजी ४४ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे तक्रारींची संख्या ६१ इतकी झाली आहे. बुधवारी एका दिवसात ४४ हरकतींची नोंद करण्यात आल्या नंतर गुरुवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी हरकती व सूचनांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. ४ सप्टेंबर या एका दिवशी सुमारे २०० हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत २६१ हरकती नागरिकांनी नोंदविल्या असल्याचे दिसून येत आहे. उशिरापर्यंत आलेल्या हरकती नोंदविण्याचे काम सुरु असून यामध्ये आकडेवारी वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

दिव्यातील प्रभाग विसंगत

दिवा येथील प्रभाग क्र. २९ मध्ये २७ व २८ मधील भागांचा जबरदस्ती समावेश करण्यात आला आहे. यामुळे भौगोलिक सलगता तुटली असून लोकसंख्या असमतोल निर्माण झाला आहे. परिणामी प्रभाग क्र. ३० वर १५-१८टक्के अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला आहे. “ही विभागणी पूर्णपणे कायदेशीर निकषांच्या विरोधात असून जनतेच्या न्याय्य प्रतिनिधित्वावर सरळ आघात असल्याची माहिती सेव्ह दिवा संघटनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख ॲड.रोहिदास मुंडे यांनी दिली.