ठाण्यातील शाळा डीजिटल; राज्यात पहिल्या क्रमांकाकडे

आमदार संजय केळकर यांच्या निधीतून शहरातील शाळांना एलईडी प्रोजेक्टर

ठाणे: आमदार संजय केळकर यांच्या निधीतून आज मंगळवारी ठाणे महापालिकेच्या शाळांना एलईडी प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले आहेत. या आधी खासगी अनुदानित आणि पात्र शाळांनाही डीजिटल करण्यात आले असून मतदारसंघातील १०० टक्के शाळा डीजिटल करण्याचा आमदार संजय केळकर यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. या बाबत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आघाडीवर असल्याचे बोलले जाते.

डिजिटल शाळा उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांच्या निधीतून आज महापालिकेच्या शाळांना एलईडी प्रोजेक्टर वाटप करण्यात आल्याने पालिकेच्या शाळा डिजिटल बनल्या आहेत. या आधी शहरातील मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित आणि पात्र शाळांनाही संगणक आणि इतर साहित्य देऊन विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना आ. केळकर म्हणाले, आज इंटरनेटने जग जवळ आले आहे. अशावेळी पालिकेच्या आणि खासगी अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्याना पाठबळ देण्यासाठी तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकारिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे, शाळांच्या दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद केल्याचे श्री.केळकर महणाले.

लॉकडाऊन काळातही आ. केळकर यांनी शेकडो गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकारिता स्मार्ट फोनचे मोफत वाटप तसेच, तीन महिन्यांचे नेट पॅकही मोबाईलवर उपलब्ध करून दिले होते. याशिवाय संस्कार संस्थेच्या माध्यमातून आ. केळकर यांनी पहिली ते १० वी च्या विद्यार्थ्यांकारिता “स्टडी क्लाऊड” ही मोफत शिक्षण प्रणाली सुरु केल्याने आजही त्याचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना होत असल्याचे आ. केळकर म्हणाले.

आ.निरंजन डावखरे म्हणाले की, आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत. त्यामुळे विद्यार्थ्याना एका क्लिकवर जगाचे ज्ञान उपलब्ध व्हावे, त्यासाठी आ. केळकर यांनी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्याची मुलं कुठेही मागे पडणार नाहीत याची खात्री आ. डावखरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास म्हात्रे यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक नारायण पवार, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, सुनेश जोशी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील आदींसह माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.