कोट्यवधींच्या अर्थकारणामुळेच फेरीवाला धोरण रखडले?

आ.संजय केळकर यांचा आरोप

मुंबई : ठाण्यात फेरीवाला व्यवसायात कोट्यवधींचे अर्थकारण दडले असल्याने अनेक वर्षांपासून ठामपाकडून फेरीवाला धोरण राबवले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत कालमर्यादेची मागणी केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिकांना तीन महिन्यांत कार्यावाहीचा अहवाल देण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले.

ठाण्यातील फेरीवाला समस्येबाबत आज आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवत कालमर्यादेत धोरण आणण्याची मागणी केली. ठाण्यात फेरीवाला व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक आल्याने गुन्हेगारी वाढू लागली आहे. फेरीवल्याच्या हल्ल्यात काही महिन्यांपूर्वी ठाण्यात एक महिला अधिकाऱ्यांची तीन बोटे छाटली गेली तर नुकतीच एका फेरीवल्याची हत्या झाली. प्रवाशांवर हल्ले करण्याच्या घटनाही या आधी झाल्याचे श्री.केळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असून त्यात मोठी अफरातफर होत आहे, त्यामुळेच ठाण्यात फेरीवाला धोरण राबवण्यात येत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत श्री. केळकर यांनी याबाबत कालमर्यादेत धोरण राबवण्याची मागणी केली.

धोरण तीन महिन्यांत होणार लागू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांना याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निर्देश देण्यात येतील असे सांगितले. फेरीवाला धोरण राबवण्याबाबत येत्या तीन महिन्यांत कार्यवाही करावी, तसा अहवाल महापालिकांनी पाठवावा, असे निर्देश देण्यात येणार असल्याचेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.