लोकसभेसाठी भाजपची विशेष रणनीती
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्याअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज तीन सभा घेणार आहेत. लवकरच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशनंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्यात प्रचाराचा धडाका लावण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत.
सर्व्हे काहीही असो…
सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण कोणताही सर्व्हे असो, फक्त मोदींचीच हवा असणार आहे, जनतेने ठरवले आहे, मोदींनाच निवडून द्यायचे. त्यामुळे आम्ही 40 च्या वर जाणार म्हणजे जाणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या सर्व्हेला कोणताही आधार नसतो, पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.