संघर्ष समितीचा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
बदलापूर: पूरनियंत्रण रेषेसंदर्भात न्याय मिळाला नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा गंभीर इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
कोणतीही पूर्वसूचना वा हरकती न घेता, पूरनियंत्रण रेषेच्या राज्यात जलसिंचन विभागाने आखलेल्या रेड लाईन व ब्लू लाईनच्या विरोधात बदलापुरात पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.
शासनाने अन्यायकारक आखलेल्या या नियमांच्या विरोधात येत्या गुरुवारपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा तसेच अन्य निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी आज बदलापुरात दिला आहे. शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक, भूमिपुत्र, सदनिकाधारक, शेतकरी यावेळी उपस्थित होते.
चुकीच्या पूररेषा दुरुस्त कराव्यात, नदीच्या धोक्याच्या पातळीचा अभ्यासपूर्वक आढावा घ्यावा, ब्लू लाईनमधील ज्या भूखंडावर, विकास आराखड्यात आरक्षण टाकलेले आहे, त्यांना टीडीआर किंवा आर्थिक भरपाई शासनाने करून द्यावी. पूर नियंत्रण करणे, नदीचे खोलीकरण, संरक्षण भिंत बांधणे तसेच आपटी व बॅरेज धरणाला स्वयंचलित दरवाजे बसवणे तसेच, पोशीर धरण लवकर बनविणे या प्रमुख मागण्या घेऊन, समितीमार्फत येत्या गुरुवारपासून बदलापूर नगरपरिषदेसमोर आंदोलन सुरू करणार असल्याचे श्री. म्हात्रे यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षांपासून अन्यायकारक पूर नियंत्रण रेषेच्या विरोधात पाठपुरावा करत असूनही, राज्यसरकार या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप श्री. म्हात्रे यांनी केला.
*बदलापूरमधील आठ गावांमध्ये पूर नियंत्रण रेषा टाकण्यात आली आहेत. तसेच 598 एकर निवासी क्षेत्र हे नगरपालिका हद्दीतील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बाधित क्षेत्र आहे. बदलापूर शहराच्या क्षेत्रफळाचा अभ्यास करता, ३६ चौ.किमी शहराच्या तुलनेत पूररेषा बाधित क्षेत्र हे निम्मे आहे. त्याचबरोबर 66 एकर जमीन ही आरक्षित असलेली जागा असून, ही जागा देखील बाधित आहे. त्याचप्रमाणे तीन हजार जीर्ण सोसायटीमधील लाखो सदनिका धारक यात बाधित आहेत. या गोष्टींमुळे बदलापूरमधील स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अभ्यासशून्य पूर नियंत्रण रेषेमुळे बदलापूरचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे.