रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदलाचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनांची दखल

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात कमीत-कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत-जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, अशा पद्धतीने रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.

मेट्रो प्राधिकरणाने बैठकीत सादर केलेल्या मूळ आराखड्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली. वागळे इस्टेट येथून लोकमान्यनगर बस डेपोमार्गे उपवन परिसरात जाणाऱ्या प्रस्तावित मार्गामुळे लोकमान्यनगरमधील सुमारे १,५०० कुटुंबे बाधित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. उपवन येथील एअर फोर्स शूटिंग रेंजलगत असलेल्या उपवन इंडस्ट्रीजचाही काही भाग प्रभावित होणार असून, ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता त्यांनी बैठकीत मांडली.

याशिवाय वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, रूणवाल प्लाझा परिसर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक १ व २, वेदांत कॉम्प्लेक्स, दोस्ती कॉम्प्लेक्स, समतानगर, लक्ष्मीनगर-चिरागनगर, वर्तकनगर-भीमनगर तसेच शास्त्रीनगर व शिवाईनगरच्या काही भागातील सुमारे एक लाख नागरिकांना या मेट्रो मार्गाचा कोणताही लाभ मिळणार नाही, ही गंभीर बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. उलट ज्या उपवन परिसरातून मेट्रो नेण्याचा प्रस्ताव होता, त्या भागात एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला उपवन तलाव असल्यामुळे भविष्यातही तेथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वागळे इस्टेट-लोकमान्यनगर बस डेपो-आई माता मंदिर-रूणवाल प्लाझा-वेदांत-आचार्य अत्रे मार्ग/वर्तकनगर-पोखरण रोड क्रमांक १-देवदया पार्क-पोखरण रोड क्रमांक २ असा पर्यायी मार्ग सुचविला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग विकसित केल्यास मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता वाढेल, मोठ्या प्रमाणावरील विस्थापन टळेल, कमी रुंदीकरणात सरळ व सोपा मार्ग उपलब्ध होईल आणि हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल,असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.