लोकसभेच्या तिकीट वाटपातून काँग्रेस जिल्ह्यातून होणार हद्दपार

भिवंडीची जागाही शरद पवार गटाकडे?

आनंद कांबळे/ ठाणे

आगामी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची शक्यता असून भिवंडी लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी, ठाणे आणि कल्याण हे तीन लोकसभेचे मतदार संघ आहेत. त्याचे प्रतिनिधित्व अनुक्रमे भाजपचे कपिल पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे हे करत आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांनी जागा वाटपाची बोलणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाणे आणि कल्याण या दोन जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचे समजते तर भिवंडी हा पारंपरिक काँग्रेसचा मतदार संघ यावेळी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात आल्याचे खास सूत्राने सांगितले आहे, त्यामुळे या मतदार संघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात देखिल केली आहे. त्यामुळे कपिल पाटील विरुद्ध बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात २०१४ साली काँग्रेसच्या तिकिटावर ओबीसी नेते विश्वनाथ पाटील हे लढले होते तर २०१९ साली काँग्रेसचे सुरेश टावरे आणि कपिल पाटील यांच्यात सामना होऊन सुमारे दोन लाख मतांनी कपिल पाटील हे दुसऱ्यांदा या मतदार संघातून विजयी झाले होते. त्यावेळी बाळ्या मामा हे अपक्ष लढले होते. हा मतदारसंघ काँग्रेसचा असला तरी त्यांची पकड ढिली झाली आहे. या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नाही तसेच काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आघाडीच्या बैठकीत पटवून दिले आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याचे एका खास सूत्राने सांगितले.

या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचे निलेश पाटील हे इच्छुक आहेत. तशी मागणी त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, परंतु बाळ्या मामा यांनी निवडणूक प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे निश्चित मानले जात आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बोलणी बाकी आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी या मतदार संघात काँग्रेस उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात दिसेल असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.