फॅन्सी व चिनी पणतीला बाजारात मागणी

भिवंडीत मातीच्या पणत्यांच्या विक्रीमध्ये घट

भिवंडी: यंदाच्या दिवाळीत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात फॅन्सी व चायनामेड पणतीची मागणी वाढल्याने पारंपरिक मातीच्या पणतीच्या विक्रीस फटका बसला आहे. मातीच्या पणत्या बाजारातून कमी होत असल्याने परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाज बांधवांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या बाजारात सर्वच वस्तूंच्या व्हरायटीला महत्व आल्याने मातीच्या साध्या पणत्यांपेक्षा नक्षीदार पणत्या, रंगविलेल्या फॅन्सी पणत्या यांचा खप वाढला आहेत. त्याचबरोबर चायना मेड मेणाच्या व पाण्याने पेटणाऱ्या पणत्यांना मागणी वाढली आहे. पूर्वी भिवंडीत मोठमोठी घरे, वाडे आणि यंत्रमाग कारखाने देखील मातीच्या पणत्यांनी उजळून निघत होते. त्यामुळे चार ते पाच लॉरी भरून आणलेल्या पणत्यांचा माल विक्री होत होता. मात्र पणत्यांची मागणी नवीन काळाच्या ओघात कमी झाल्याने कुंभार व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. बाजारपेठेच्या परिणामामुळे कुंभारकाम करणारे देखील कमी झाल्याने भविष्यात मातीच्या पणत्या लोप पावून तयार पणत्या बाजारात आल्यास नवल वाटायला नको.

गेल्या पाच महिन्यांपासून पाऊस पडत असल्याने सर्व हिंदू परंपरांच्या सणांवर परिणाम झाला. लोकांमधील उत्साह कमी झाला. पावसामुळे अनेक भाविकांनी हौसमौज न करता केवळ सणांच्या रितिरिवाज पाळत सण उरकत घेतले. त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेवर झाला. मात्र दिवाळीच्या सणांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांमध्ये उत्साह दुपटीने संचारल्याने शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत.दरम्यान गुरुवारी अचानक पावसाने अचानक हजेरी लावल्याने बाजारपेठेत असलेल्या फेरीवाल्यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे मातीच्या पणत्या आणि मडकी भिजली.