अंबरनाथ: लोकलच्या प्रवासात महिला प्रसूत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी आरपीएफच्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे संबंधित महिलेला दिलासा मिळाला. शनिवार 10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता कल्याणहून अंबरनाथला आलेल्या लोकलमध्ये ही आनंदाची घटना घडली.
अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही गर्भवती महिला काही कामानिमित्त कल्याणला गेली होती. कल्याणहून लोकलने अंबरनाथला परत येत असताना लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्या महिलेचे विव्हळणे ऐकून लोकलमधील सह प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. लोकल अंबरनाथ स्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी तत्काळ आरपीएफ कार्यालयात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच आरपीएफच्या ड्यूटीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी मदतीसाठी लोकल डब्यात धाव घेतली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी लोकलमधील सर्व पुरुष प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर लोकलच्या डब्याचे दोन्ही दरवाजे बंद करून घेतले आणि महिला प्रवाशांच्या मदतीने चादर तसेच इतर उपलब्ध साधनाच्या मदतीने पडदा करून प्रसुतीची तयारी केली. महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे व धाडसामुळे लोकल डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अन् नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
महिला पोलीस उपनिरीक्षक नन्देश्वर यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेच प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले. दरम्यान, प्रसूती नंतर नवजात बाळाला व आईला तातडीने अंबरनाथच्या छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.