महापालिका निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर

* उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
* ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन

ठाणे: राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महायुती सरकार असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युतीबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच होईल, असे स्पष्ट प्रतिपादन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसमुळेच शरद पवार यांचे पंतप्रधान पद हुकल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनीही अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.
ज्यावेळी असे विधान मोठ्या व्यक्ती करतात त्यावेळी आमच्यासारख्या लोकांनी बोलू नये, मात्र अशा प्रकारचे प्रसंग दोन तीन वेळेस आले होते, पण जे यश मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करून दिली. आधी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जावेत, लोकांची मते, विचार, तक्रारी, सोडविण्याचे ठिकाण बनायला हवे. पक्ष कार्यालय हे संवादाचे केंद्र बनायला हवे, नवीन राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यालयात अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना स्वतंत्र केबिन, पत्रकार परिषद, पक्षाच्या बैठकीसाठी जागा असे प्रशस्त कार्यालय प्रथमच उभारण्यात आलेले आहे. हे कार्यालय जनतेसाठी खुले असायला हवे, मुंबईला जाता-येता माझे या कार्यालयावर लक्ष्य राहणार आहे असे सांगून एसआरए प्रोजेक्टमध्ये गरीबांना घरे दिली जातील, युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देण्याबाबत आमचा प्रयत्न असणार आहे. यातून शहराचा, राज्याचा, देशाचा विकास व्हावा यासाठी सत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा नावलौकिक वाढविला आहे. शरद पवार हे आमचे आदर्श असून त्यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद पराजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे महिला अध्यक्षा वनिता गोतपगार, ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद (वीरु) वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ठाणे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.

जुलै महिन्यात कार्यालय उद्घाटनाना कार्यक्रम रद्द झाल्यावर हे कार्यालय उघडू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. आज ९ ऑगस्ट क्रांतीदिनी अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर अनेकांना धडकी भरली आहे. -आनंद परांजपे

आजवर पक्ष स्थापनेपासून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीच्या माणसांच्या हाती होता. पक्षात असलेली ताकद आता संपली असून अजित पवार यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. – नजीब मुल्ला