दोन राजधानी, एक रणभूमी: मुंबई विरुद्ध दिल्ली

वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 रंगात येत असताना, क्रिकेटविश्वाला पुन्हा एकदा एका ओळखीच्या पण नेहमीच थरारक अशा लढतीची उत्सुकता लागली आहे. भारताच्या दोन राजधानी — आर्थिक राजधानी मुंबई आणि राजकीय केंद्र दिल्ली — वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला आणखी खास बनवते ती वैयक्तिक कथा — मुंबईची मुलगी जेमिमा रोड्रिग्ज दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना आपल्या घरच्या फ्रँचायझी मुंबई इंडियन्सविरुद्ध उभी ठाकणार आहे.

या प्रतिस्पर्ध्यांमधील मागील सामना अवघ्या दहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत झाला होता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध करत दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने 195 धावांचा डोंगर उभारला आणि नंतर दिल्लीला 145 धावांत गुंडाळले. त्या विजयाची पायाभरणी नॅटली सिव्हर-ब्रंट (70) आणि हरमनप्रीत कौर (74) यांच्या जबरदस्त खेळीने झाली, तर निकोला केरी आणि अमिलिया कर या परदेशी अष्टपैलूंनी सहा बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीचा कणा मोडला.

मात्र त्यानंतर दोन्ही संघांची कामगिरी फारशी स्थिर राहिलेली नाही. दोन्ही संघांनी तीन सामने खेळून केवळ एकच विजय मिळवला आहे. स्पर्धेचा अर्धा टप्पा पूर्ण होत असताना, आता प्रत्येक सामना प्ले-ऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुकांना अजिबात वाव नाही. इतिहास पाहिला तर दबावाच्या क्षणी हे दोन्ही संघ चांगली कामगिरी करतात — मुंबई इंडियन्सने 2023 आणि 2025 मध्ये विजेतेपदे पटकावली आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने WPLच्या तिन्ही हंगामांत अंतिम फेरी गाठली आहे.

असे असले तरी, या निर्णायक लढतीआधी दोन्ही संघांसमोर काही महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे सलामीची जोडी. पाच सामन्यांत त्यांनी चार वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या आजमावल्या आहेत, पण ठोस सुरुवात मिळालेली नाही. सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत, आणि केरी मधल्या फळीला मजबूत आणि संतुलित बनवत असले तरी पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात न मिळणे ही चिंतेची बाब ठरली आहे. लीग टप्प्यात फक्त तीन सामने शिल्लक असताना, गतविजेत्यांना लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा लागेल. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची निवडही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. केरी, सिव्हर-ब्रंट आणि कर उत्तम फॉर्ममध्ये असताना, चौथ्या स्थानासाठी हेली मॅथ्यूज आणि शबनिम इस्माईल यांच्यात चुरस आहे. मॅथ्यूजला वगळल्यास सलामी कोण करणार हा प्रश्न उभा राहतो, तर इस्माईलला बसवल्यास गोलंदाजीतील धार कमी होण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्ससमोरही परदेशी खेळाडूंच्या संयोजनाचा पेच आहे. लिझेल ली, लॉरा वोल्वार्ड्ट आणि मारिझान काप हे दक्षिण आफ्रिकेचे त्रिकुट कोणत्याही संघात आपोआप स्थान मिळवते आणि दिल्लीही त्याला अपवाद नाही. प्रश्न आहे तो चौथ्या परदेशी खेळाडूचा. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या मागील सामन्यात दिल्लीने अनुभवी वेस्ट इंडियन शिनेल हेन्रीऐवजी युवा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ल्युसी हॅमिल्टनवर विश्वास दाखवला. खालच्या फळीत फटकेबाजी आणि डावखुऱ्या हाताची गोलंदाजी यामुळे हॅमिल्टनला थोडी सरशी मिळते, विशेषतः हेन्रीची कामगिरी आतापर्यंत चढ-उताराची राहिली असल्यामुळे. मात्र, याच स्पर्धेत मुंबईविरुद्ध हेन्रीने केलेली निर्णायक 56 धावांची खेळी दिल्ली नक्कीच लक्षात ठेवेल.

या दोन संघांमधील सर्वात ठळक फरक त्यांच्या कर्णधारांच्या फॉर्ममध्ये आणि अनुभवात दिसतो. दोन वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून देणारी हरमनप्रीत कौर, हिने पाच सामन्यांत 199 धावा झळकावल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांतचा समावेश असून, त्यापैकी एक दिल्लीविरुद्ध आहे. याउलट, पहिल्यांदाच दिल्लीचे नेतृत्व करणारी जेमिमा रोड्रिग्ज चार डावांत केवळ 41 धावा करू शकली आहे, तिची सर्वोच्च धावसंख्या 21 आहे. अनेकदा संघाची कामगिरी कर्णधाराच्या फॉर्मचे प्रतिबिंब असते. दिल्लीला पुन्हा विजयाच्या मार्गावर यायचे असेल, तर त्यांच्या युवा कर्णधाराने पुढाकार घेणे गरजेचे ठरेल.

या दोन दिग्गज संघांच्या लढतीत केवळ एकच राजधानी प्ले-ऑफच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकेल. अनुभव आणि ताकदीच्या जोरावर मुंबई बाजी मारणार की जिद्द आणि पुनरागमनाच्या आशेवर दिल्ली विजयाचा गुलाल उधळणार?

आमने-सामने (मागील 5 सामने)
मुंबई इंडियन्स – 2 | दिल्ली कॅपिटल्स – 3

सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 20 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: कोटांबी स्टेडियम, वडोदरा
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार