वसई: वसईत एका शिबिरासाठी आलेले भाजप नेते प्रवीण दरेकर, त्यांच्यासोबत असलेल्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक ज्या लिफ्टमध्ये होते, ती लिफ्ट बिघाडामुळे थांबली. सर्व लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून दरेकरांसह इतरांची सुटका केली.
महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर हे आज वसईत तब्बल 10 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टची क्षमता केवळ 10 जणांची असूनही त्यामध्ये 17 जण चढल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली. परिणामी लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण चिंताग्रस्त झाले. पण अखेर 10 मिनीटांनतर सर्वांची सुटका झाली. घटनेनंतर कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. लोंखंडी रॉडच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला. लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर प्रविण दरेकर आणि राजन नाईक यांनी पाणी पिऊन विश्रांती घेतली. या घटनेमुळे कार्यक्रमातही काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पुढे शिबिर सुरळीत पार पडले.