ठाणे: जिल्ह्यातील नागरिकांची या वर्षाची पाणीटंचाई मिटली असून जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे ९८ टक्क्यांपेक्षा जास्त भरली असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि इतर नगरपालिकांना भातसा, तानसा, बारवी, आणि मोडक सागर या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
मागिल तीन महिने जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला आहे, त्यामुळे अंबरनाथ येथिल बारवी धरणात ३३३.५१० दशलक्ष घनमिटर पाणीसाठा असून हा साठा ९८.४३टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणातून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसी यांना पाणीपुरवठा केला जातो. भातसा तानसा, मोडकसागर या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ९८. ६१टक्के पाणीसाठा आहे. ठाणे महापालिकेला आणि मीरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९१४. ०६० दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा ९७.५१टक्के असून आणखी काही दिवस पावसाची रिपरिप सुरु राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ठाणे आणि मुंबईची तहान भागाविण्यासाठी पुरेसा आहे. एप्रिल आणि मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईतून ठाणेकरांची सुटका होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २५६७.७ मि.मी. पाऊस झाला असून मागिल वर्षाच्या तुलनेत १०५टक्के इतका पाऊस जिल्ह्यात झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.