उल्हासनगरमध्ये नागरिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील तानाजी नगर व गणगौर चौक परिसरात शनिवारी महावितरणकडून अचानक विद्युत पुरवठा ओव्हरलोड झाल्याने १०० पेक्षा अधिक घरांतील टीव्ही, फ्रीज, पाणी मोटारी, वाय-फाय राऊटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वारंवार वीज खंडित होत असल्याने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांनी महावितरणकडून नुकसान भरपाईची मागणी केली असून, यासाठी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख केशव ओवळेकर यांनी तत्काळ महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र दोन तास उलटल्यानंतरही कुठलेही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखाप्रमुख केशव ओवळेकर, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, माजी नगरसेवक दिलीप गायकवाड, पप्पू वाघ, शाम घोडके तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांची पाहणी केली. नंतर वीज बिलांचे पुरावे एकत्र करून महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
या घटनेबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.