७९ लाख २७ हजारांचा दंड
ठाणे : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून नळवाहिन्यांना छिद्र पाडून त्याद्वारे पाणी चोरी करण्याचे प्रकार वाढले असून अशा पाणी चोरांविरोधात पालिका प्रशासनाने विशेष मोहिम राबविली आहे. या मोहिमेत गेल्या चार वर्षांत ७३ पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचबरोबर त्यांना ७९ लाख २७ हजारांचा दंड आकारला आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात दररोज १२० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. या शहराला दररोज १६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे. या शहरातही काही ठिकाणी टंचाईची समस्या जाणवते. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असतानाच, त्यात पाणी चोरांकडून जलवाहीन्यांना छिद्र पाडून पाणी चोरी केली जात आहे. हे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. यामुळे शहरातील पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन भिवंडी-निजामपूर शहर महानगर पालिका प्रशासनकडून अशा पाणी चोरांविरोधात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने मोहिम राबविण्यात येत आहे.
आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप पटणावर यांचे पथक पाणी चोरांचा शोध घेऊन कारवाई करत आहे. गेल्या चार वर्षांत ७३ पाणी चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात घरगुती नळजोडणीचे ३९, व्यावसायिक आणि औद्योगिक नळजोडणीचे प्रत्येकी १७ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, पाणीचोरांवर पालिका दंडात्मक कारवाई करत असून आतापर्यंत या पाणी चोरांना ७९ लाख २९ हजार २७२ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.