बनावट लोणी प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने विक्री

खोणीत कारखाना उद्ध्वस्त

डोंबिवली: काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीत एका विकासकाच्या निर्माणाधिन इमारतीत बनावट लोणी तयार करून ते अमूल कंपनीच्या नावाने विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचा कच्चा माल जप्त करून पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांंनी संबंधित कारखाना उद्ध्वस्त केला.

डोंबिवलीजवळील खोणी गाव हद्दीत तरंग हाॅटेलजवळील संतलाल शर्मा यांच्या निर्माणाधिन इमारतीत बनावट लोणी तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खोणी गावातील बनावट लोणी तयार करण्याच्या काऱखान्यात मंगळवारी छापा मारला. त्यावेळी तेथे पिंटु यादव (३६), प्रेमचंद फेकुराम (३२) हे बनावट लोण्याची प्रक्रिया करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मानवी सेवनास हानीकारक अशा पध्दतीने हे लोणी तयार करून ते डोंबिवली, कल्याण परिसरातील हाॅटेल्स, ढाबे, चायनिज, भाजीपाव विक्रेत्यांना अमूलची नाममुद्रा लावून विकले जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीला आले.

हे बनावट लोणी तयार करण्यासाठी संतलाल शर्मा यांनी आपल्या निर्माणाधिन इमारती मधील जागा कशी दिली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलीस या जागेसंबंधी चौकशी करत आहेत.

लोणी बनविण्याची पध्दत
पिंटू यादव हा कमानी करूणा, शुध्द पामोलिन हे वनस्पतीजन्य खाण्याचे तेल, मीठ, अनॅटो अन्न रंगविण्याचा रंग यांचे मिश्रण एकत्र करून ते एका टाकीत टाकत होता. हे मिश्रण घोटण्याच्या यंत्राने एकजीव करून चौकोनी साच्यात टाकून ते घट्ट होण्यासाठी शीत कपाटात ठेवले जात होते. घट्ट झालेले लोणी बाहेर काढून त्याचे चौकोनी तुकडे करून ते तुकडे अमूलची नाममुद्रा असलेल्या खोक्यात भरून ते डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातील हाॅटेल्स, पावभाजी विक्रते, ढाबे मालक, बिअर बार, भेळ विक्रेते यांना अमूलच्या नावाने विकले जात होते. आपण तयार करत असलेला पदार्थ मानवी सेवनास हानीकारक आहे हे माहिती असुनही त्याची विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी अन्न भेसळ कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई साहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संदीप चव्हाण, संजय माळी, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, गुरुनाथ जरग, विलास कडू, अनुप कामत, दीपक महाजन, मेघा जाने, विजेंद्र नवसारे, सचीन वानखेडे, मंगला गावीत, अमोल बोरकर यांच्या पथकाने केली.