नगरसेवकांनी प्रभागाचे मालक नव्हे; सेवेकरी व्हावे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी टोचले भावी नगरसेवकांचे कान

ठाणे: नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागाचे मालक असल्याप्रमाणे वागतात. प्रभागात एकही काम त्यांच्या परवानगीशिवाय होऊ नये, अशी मालकी वृत्ती त्यांची असते. भावी नगरसेवकांनी सेवाभावी वृत्ती अंगिकारावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिला. ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी श्री. फडणविस यांची मुलाखत घेतली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. पोशीर आणि पेल्हार या दोन धरणांचे काम मागील २५ वर्षे राखडले होते, वन विभाग परवानगी देत नव्हते. त्यांची अडचण त्या भागातील पाच गावे होती, ती गावे विस्थापित होणार होती, गावातील नागरिकांशी चर्चा केली असता ते स्वत:हून स्थलांतरित होण्यास तयार झाले. त्यामुळे मुंबईला ५०० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. काळू धरण होईपर्यंत ठाण्यासह मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सुटणार आहे, असा दावा श्री. फडणविस यांनी केला.

भाजपच्या सर्वच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्रपणे लढावे. कारण, ही निवडणूक जवळपास दहा वर्षांनंतर होत आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांची ही भावना आमच्यासमोर मांडली होती. प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी राजकारणात तयार होत असते. २०१७ च्या निवडणुकीनंतर एक पिढी तयार झाली. २०२२ मध्ये निवडणूक अपेक्षित होती, पण ती झाली नाही. त्यामुळे २०२२ नंतर अजून एक पिढी तयार झाली. परिणामी, आज दोन पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हे चित्र प्रत्येक पक्षात दिसत आहे. अशा परिस्थितीत जर आपण स्वतंत्र न लढता युतीत लढलो, तर आपल्या कार्यकर्त्यांना पुरेसा न्याय देता येणार नाही, त्यांना लढण्याची संधी मिळणार नाही, अशी भावना अनेकांची होती, असे फडणवीस म्हणाले. काही जागांच्या गणितासाठी वेगवेगळे लढलो असतो, तर कदाचित सत्ता मिळालीही असती. पण त्यातून कुठेतरी मने दुखली असती, असे ते म्हणाले. संपूर्ण एमएमआरमध्ये फूट पाडण्यापेक्षा, एकत्र येऊन लढणे अधिक महत्त्वाचे होते. याच भूमिकेतून आम्ही ठरवले की आवश्यकता पडली तर थोडी पडती बाजू घ्यायची, कमी जागा स्वीकारायच्या. पण युतीतच लढायचे. मी आणि रवींद्र चव्हाण यांनी ही भूमिका आमच्या टीमसमोर मांडल्यानंतर सर्वांनी समजूतदारपणे त्याला मान्यता दिली. त्यामुळे आज आम्ही एकत्र लढत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय योग्य आहे. मुंबईमध्येही हा निर्णय बरोबर ठरला, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत, आणि ठाणे ही त्यांची राजकीय ओळख आहे. त्यांच्या ठाणे शहरात जर आम्ही त्यांना दुखावले, तर आपण मित्रपक्ष कसले, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच आम्ही ठरवले की, शिंदे म्हणतील त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा, तो आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगायचा. आमच्या कार्यकर्त्यांनीही समजूतदारपणा दाखवला आणि सगळे एकत्र आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव खरा ब्रँड होता. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणताही वैयक्तिक ब्रँड उरलेला नाही. मात्र, माझी आणि एकनाथ शिंदे यांची महायुती इतकी मजबूत आहे की कोणीही स्वतःला ब्रँड म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा बँड वाजविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधूवर केली.

नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागातील सुई एवढे काम देखील त्यांच्या मर्जीशिवाय होऊ देत नाहीत, ते स्वतःला प्रभागाचे मालक समजतात. ही प्रवृत्ती सोडून त्यांनी मूळ सेवाभावी वृत्ती अंगिकारावी, अशी अपेक्षा श्री. फडणविस यांनी व्यक्त केली.

श्री.बल्लाळ यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रश्न विचारत श्री. फडणविस यांना बोलते केले. श्री. फडणविस यांनी ठाणे तसेच एमएमआर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या पाच वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर २०३० पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला. कोस्टल रोडचीही कनेक्टीव्हीटी रिंग करून सर्व वाहतुक भविष्यात शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचे स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यत कनेक्टीव्हीटीचे नियोजन केले असल्याचे सांगितले. घनकचऱ्याच्या आणि डंपिंगच्या समस्येवर त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजननुसार पुढच्या तीन चार वर्षात सर्व डंपिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले. एमएमआर क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास, घोडबंदर रोडची समस्या सुटण्यासाठी २०० नॉटीकल्स माईल्सचा विचार करून कोलशेत-दिवा येथे पाच जेटी उभारणार, तसेच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचे सांगुन ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचे नियोजनही फडणविस यांनी सविस्तरपणे मांडले.