कल्याण : गर्दी टाळण्यासाठी लोकल ट्रेनच्या सामानाच्या डब्यात चढलेल्या ६५ वर्षीय सेवानिवृत्त मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याचा गुरुवारी दुपारी कल्याण ते टिटवाळा दरम्यान सहप्रवाशासोबत झालेल्या वादातून मृत्यू झाला आहे. इतर प्रवाशांनी संशयिताला पकडून कल्याण जीआरपीकडे सोपवले.
बबन हांडे असे मृताचे नाव असून तो कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहणारा आहे. या हत्ये प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सुनील भालेराव याला अटक केली आहे. बबन हांडे हे अंबिवलीहून कल्याणला रेशनिंग दुकानात आले होते. काम संपल्यानंतर ते पुन्हा आंबिवलीला जाण्यासाठी कल्याण स्थानकात टिटवाळा लोकलच्या लगेज डब्यात चढत होते. यावेळी आरोपी सुनील भालेराव देखील लोकल मध्ये चढत होता. याच वेळी हांडे यांचा सुनीलला पाय लागला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. यावेळी सुनीलने वृद्ध बबन यांना बेदम मारहाण केली. यात त्यांचा लोकलमध्येच मृत्यू झाला. दरम्यान एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना याची माहिती देताच टिटवाळा लोकलमधून आरोपी सुनील भालेरावला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. दरम्यान या हत्येमुळे लोकलमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.