नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजार आवारातील कांदा-बटाटा आवार, मॅफको मार्केट व मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा केंद्र या इमारती महापालिकेने अतीधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र नोटीस बजावून देखील या इमारतींचा वापर सुरू ठेवल्याने महापालिकेने अखेर गुरुवारी इमारतींची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे नळ जोडणी खंडित करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच ही नळ जोडणी पुन्हा सुरू करण्यात आली होती.
मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा-बटाटा आवारातील इमारती, मॅफको मार्केट व मध्यवर्ती सुविधा केंद्र इमारत अतीधोकादायक घोषित केल्या आहेत. तर पावसाळ्यात या इमारतीचे कोसळल्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. नुकतेच रविवार १५, जून रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा सज्जा पडल्याची घटना घडली होती. दोन वर्षापूर्वी कांदा-बटाटा बाजारातील लिलावगृहाची कमान तसेच काही गाळ्यातील सज्जा भाग कोसळले होते. गेली अनेक वर्षे या मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळे धारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र तरीदेखील तेथे व्यावसायिक व्यापार सुरूच होता. त्यामुळे भविष्यात सदर इमारती कोसळून कुठली जीवितहानी होऊ नये म्हणून गुरुवारी मनपा तुर्भे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व संपूर्ण कांदा-बटाटा मार्केटची नळजोडणी खंडित केली आहे. मागील वर्षी देखिल अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. मात्र कालांतराने पुन्हा येथील पाणीवापर सुरू झाला होता. त्यामुळे आता केलेली कारवाई किती दिवस टिकते याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.