विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास संघर्ष अटळ

खासदार सुरेश म्हात्रे यांचा संसदेत इशारा

नवी मुंबई: ननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून मागील ११ वर्षांपासून समस्त भूमिपुत्रांची मागणी आहे. मात्र आता विमानतळ सुरु होत असून देखील नाव दिले जात नाही. त्यामुळे विमानतळाला नाव न दिल्यास संघर्ष अटळ आहे, अशी भूमिका खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदेत मांडली.

दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईतील भूमिपुत्रांसाठी लढा देऊन संपादित जमिनीच्या बदल्यात जमीन असा साडेबारा टक्के योजनेचा कायदा करण्यास शासनाला भाग पाडले. स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायद्याची मागणी तसेच पाचवेळा आमदार, विरोधी पक्षनेते, खासदार आदी पदे त्यांनी भूषवल्याची माहिती खा.म्हात्रे यांनी यावेळी दिली. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी येथील भूमिपुत्रांची मागणी आहे. यासाठी अनेक आंदोलने झाल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

विमानतळ उद्घाटनापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव तीन महिन्यांत देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आश्वासनानंतर नामकरणाबाबत कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. एकीकडे विमानतळ सुरू होणार असताना नामकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप पुष्टी केली जात नाही. नाव देण्याबाबत भूमिपुत्र आता अंतिम लढाई लढण्याच्या तयारीत आहेत. नाव न दिल्यास संघर्ष अटळ आहे. त्यामुळे या विमानतळाला लवकरात लवकर स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खा. म्हात्रे यांनी गुरुवारी हिवाळी संसदीय अधिवेशनात केली. या आधीही पावसाळी अधिवेशनात ३० जुलै २०२५ रोजी त्यांनी ही मागणी केली होती.