काँक्रीटीकरणामुळे ‘हिट आयलंड’चा धोका वाढला

४० अंशांच्या उष्णतेने ठाणे होरपळू लागले
ठाणे: ठाणे शहरातील तापमानाने सध्या ३८ ते ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून, वाढत्या काँक्रीटीकरणामुळे ‘अर्बन हीट आयलंड’चा प्रभाव तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
एकेकाळी हिरवाईसाठी ओळखले जाणारे ठाणे आता सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यात अडकत असून, याचा थेट परिणाम पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
ठाण्यात मोकळ्या जागा आणि हिरवळीचे प्रमाण झपाट्याने घटत असल्याने ‘इव्हॅपो-ट्रान्सपिरेशन’ ही नैसर्गिक प्रक्रिया कमी होत आहे. झाडांच्या माध्यमातून वातावरणातील उष्णता कमी करण्याची क्षमता घटल्याने शहरात उष्णतेचा साठा वाढत आहे. विशेषतः मोठ्या, छायादायी वृक्षांची तोड करून त्यांच्या जागी शोभेची किंवा जलद वाढणारी पण कमी पर्यावरणीय उपयुक्तता असलेली झाडे लावण्याचा वाढता कल परिस्थिती अधिक गंभीर करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, काचेच्या इमारतींमुळे स्थानिक पातळीवर ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’सदृश स्थिती निर्माण होते. सूर्यप्रकाश आत येतो, मात्र उष्णता पूर्णपणे बाहेर जात नाही, त्यामुळे परिसरातील तापमानात आणखी वाढ होते. याशिवाय वाहनांची वाढती संख्या, वातानुकूलन यंत्रांचा वापर आणि औद्योगिक क्रियाकलापही उष्णतेत भर घालत आहेत.
तापमानवाढीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, उष्माघात, श्वसनविकार आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मैदानी काम करणारे नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात ‘ग्रीन कव्हर’ वाढवणे, देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन, मोकळ्या जमिनींचे संरक्षण आणि ‘कूल रूफ’ तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. तसेच शहरी नियोजनात पर्यावरणीय समतोलाला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेले ठाणे शहर सध्या विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाच्या टप्प्यावर उभे आहे. योग्य वेळी शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवल्यासच भविष्यातील उष्णतेचा व प्रदूषणाचा धोका टाळता येईल; अन्यथा ‘स्मार्ट सिटी’सोबतच ‘हॉट सिटी’ अशी ओळख निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरात सिमेंट-काँक्रीट वाढल्यामुळे जमीन उष्णता शोषून ठेवते आणि हवा थंड होण्याची प्रक्रिया कमी होते; त्यामुळेच ठाण्यात तापमान वाढत आहे. हिरवळ वाढवणं हाच यावर सोपा आणि परिणामकारक उपाय आहे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.
चौकट
शहरी पर्यावरणशास्त्रानुसार, मोकळी जमीन, जलस्रोत आणि दाट वृक्षराजी हे घटक नैसर्गिक शीतलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र शहरात काँक्रीटची डांबरी रस्ते, वाढती बांधकामे आणि काचेच्या उंच इमारती यामुळे उष्णता शोषून ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची प्रक्रिया वाढते. परिणामी दिवस-रात्र तापमानातील फरक कमी होऊन परिसर अधिक उष्ण राहतो.